महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची परस्पर माघार…
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुती आणि महा विकास आघाडीने उमेदवारी दिलेल्या अधिकृत उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून संबंधित पक्षाला न सांगताच आपापली उमेदवारी आज परस्पर मागे घेतल्याने दोन्ही बाजूंची राजकीय अडचण झाली आहे.
अहील्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघात विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या जागी त्यांची पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भाजपाने उमेदवारी दिली होती मात्र आपल्या जागी आपल्या मुलाला ती द्यावी अशी त्यांची अपेक्षा होती, ती पक्षाने अमान्य करीत प्रतिभा यांनाच उमेदवारी दिली त्यामुळे मुलाने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला, आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रतिभा पाचपुते यांनी मुलासाठी माघार घेत पक्षाला अडचणीत आणले आहे, आता महायुतीचा तिथे उमेदवारच राहिलेला नाही.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून उभ्या असणाऱ्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली असून बंडखोरी करणाऱ्या काँग्रेस उमेदवार राजेश लाटकर हे संपर्काच्या बाहेर आहेत. त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडी लंगडी पडल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील राजकारण काही संपायची चिन्हे नाहीत. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी निवडणुकीतून आज माघार घेतली. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दहा मिनिटात खासदार शाहू महाराज, युवराज मालोजीराजे छत्रपती तसेच मधुरिमाराजे छत्रपती या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या आणि त्यांनी उमेदवारी मागे घेतली. या मतदारसंघातून काँग्रेसकडून पहिल्यांदा राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यांच्या उमेदवारीला नगरसेवकांनी विरोध केला. त्यामुळे उमेदवारी बदलली होती त्या ठिकाणी मधुरिमाराजेंना उमेदवारी दिली तर लाटकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. आज सकाळपासून लाटकर यांचा फोन बंद आहे. या विषयावरून तोंडघशी पाडल्याबद्दल काँग्रेसचे सतेज पाटील चांगलेच संतप्त झाले आहेत.