NEET पेपरफुटीच्या मास्टरमाईंडला अटक
पुणे, दि. १५ : ३ मे रोजी झालेल्या NEET परीक्षेचा पेपर फोडून लाखो विद्यार्थी आणि पालकांची झोप उडवणाऱ्या पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. CBI ने देशभर जोरदार कारवाई करत पेपरफुटीची पाळेमुळे शोधण्यास सुरुवात केली आहे. पेपरफुटीचा मास्टरमाईंड CBI च्या ताब्यात आला असून पी व्ही कुलकर्णी असं त्याचं नाव आहे.CBI ने कुलकर्णीला पुण्यातून ताब्यात घेतलं असून तो NTA शी संबंधित असल्याचंही समोर आलं आहे. 3 मे रोजी झालेल्या NEET परीक्षेचा पेपर आधीच फुटल्याचं समोर आल्यानंतर ती परीक्षा रद्द करण्यात आली आहे. NEET पेपर लीक प्रकरणात CBI ने गेल्या २४ तासांत देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
या प्रकरणाचा सूत्रधार आरोपी कुलकर्णी मूळचा लातूरचा आहे. तो पुण्यात केमिस्ट्रीचा प्राध्यापक आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या परीक्षा प्रक्रियेत त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याला प्रश्नपत्रिका सहज उपलब्ध व्हायच्या. कुलकर्णी लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये केमिस्ट्रीचा प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. तो आता निवृत्त झालेला आहे. आरोपी मनीषा वाघमारेच्या चौकशीतून सीबीआय कुलकर्णीपर्यंत पोहोचली. त्याची बराच वेळ चौकशी करण्यात आली. यानंतर त्याला अटक केली गेली.
CBI ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२६ च्या अखेरच्या आठवड्यात कुलकर्णीनं एक अन्य आरोपी मनीषा वाघमारेच्या मदतीनं विद्यार्थी गोळा केले. त्यानंतर त्यानं पुण्यातील स्वत:च्या घरी स्पेशल कोचिंग क्लास घेतले. मनीषा वाघमारेला सीबीआयनं १४ मे २०२६ रोजी अटक केलेली आहे. पुण्यातील क्लासमध्येच विद्यार्थ्यांना परीक्षेत येणारे प्रश्न, त्यांचे पर्याय आणि योग्य उत्तरं सांगण्यात आली. तेच प्रश्न ३ मे २०२६ रोजी झालेल्या NEET-UG परिक्षेत आल्याचं पुढे उघडकीस आलं.