श्री महालक्ष्मी मंदिरात यादवकालीन शिलालेख

 श्री महालक्ष्मी मंदिरात यादवकालीन शिलालेख

कोल्हापूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात इसवी सनाच्या १२ व्या शतकातील यादवकालीन शिलालेख आढळला आहे. Inscriptions of the Yadava period at Sri Mahalakshmi Temple सरस्वती देवीच्या प्रदक्षिणा मार्गातील पूर्व भिंतीत नुकताच हा शिलालेख आढळून आला.

संस्कृत भाषेतील देवनागरी लिपीतील हा शिलालेख काळाच्या ओघात मंदिरातील अंतर्गत बदलांमध्ये भिंतीत वापरण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं मंदिर परिसरातील मूळ स्थापत्याच्या जतन-संवर्धन- संरक्षणाचं काम सध्या सुरू आहे.

या अंतर्गत मूळ दगडी स्थापत्यावर लावण्यात आलेली संगमरवरी फरशी काढण्याचं काम टप्प्याटप्प्यानं राबवलं जात आहे. यामध्ये सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गातील पूर्वेकडील भिंतीची पाहणी करताना हा शिलालेख धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर-देसाई यांच्या निदर्शनास आला. मूळ मंदिराचा भाग असलेल्या या शिलालेखाचा नंतर दगडी बांधकामात आडवा दगड म्हणून भिंतीत वापर करण्यात आला आहे.यानंतर सचिव शिवराज नाईकवाडे
यांनी पाहणी केली.

श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या इतिहासाचा आणखी एक अस्सल पुरावा या शिलालेखाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. यापूर्वी मंदिरात नवगृह मंदिरासमोरील (अष्टदिक्पाल मंडप) खांबावरील शिलालेख, निंबरसचा हळेकानडी लिपीतील शेषशाई मंदिरातील शिलालेख, यादवकालीन गजेंद्र लक्ष्मीजवळील शिलालेख, गारेचा गणपती मंदिर परिसरातील सिंगनेदव, यादवकालीन महाद्वाराचा शिलालेख आदी शिलालेख प्रकाशझोतात आले आहेत, असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी सांगितलं.

इसवी सनाच्या बाराव्या शतकातील हा यादवकालीन शिलालेख असा आहे.हा शिलालेख २ फूट लांब आणि १ फूट रुंद आहे. संस्कृत आणि देवनागरीतील या शिलालेखावर १६ ओळी आहेत.

गद्धेगाळ किंवा गद्धेगाळी शिलालेख शापा-आशीर्वादात्मक, दानपत्र स्वरूपातील आहे. मूळ मंदिराचा भाग असलेला आणि नंतर दगडी बांधकामात आडवा दगड म्हणून याचा भिंतीकरिता वापर केला आहे.

मंदिर प्राकारातील सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाच्या पूर्व भिंतीत हा शिलालेख आडवा आहे.श्रीकरवीरनिवासीनी अंबाबाई मंदिरातील इतिहासात आणखीन एक मौल्यवान भर पडली आहे.

या शिलालेखाचे पुरातत्त्वीय ईपीग्राफ (छाप) घेऊन त्याचं वाचन आणि भाषांतर करून त्यावरील माहिती जाहीर केली जाईल, असं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी सांगितलं.

ML/KA/PGB
7 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *