पश्र्चिम विदर्भात गणपती बाप्पाचे झाले स्वागत

बुलडाणा/ वाशिम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुखकर्ता , दुःखहर्ता , अशी ख्याती असणाऱ्या बाप्पाचे आगमन आज बुलडाणा जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात आणि घराघरांमध्ये झाले आहे . लाडक्या बाप्पाला घरामध्ये विराजमान करण्यासाठी आणि बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी बुलडाणा येथील बाजार पेठेत लहानापासून ते थोरांपर्यतच्या गणेश भक्तांची लगबग सकाळपासून दिसून आली. बाजारपेठेमध्ये बाप्पांना सजवण्याच्या साहित्य विक्रीच्या दुकानावर बाप्पाच्या भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने बाजारपेठ फुलून गेली होती.
दुपारनंतर घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री गणरायाची दहा दिवसांसाठी प्राणप्रतिष्ठा केला गेली आहे.
वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील वीर मराठा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी यंदाच्या गणेश उत्सवात कागदापासून गणेशाची साडेपाच फूट उंचीची पर्यावरणपूरक मूर्ती साकारली असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे.
सदर पर्यावरणपूरक बाप्पा निर्मितीसाठी मंडळाने सेंचुरी पेपरचा वापर केला असून विविध रंगीबेरंगी कागदी फुलांनी मूर्तीला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान ही मूर्ती निर्माण करण्यासाठी तब्बल एक महिन्याचा कालावधी लागला असून वीर मराठा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सात सदस्यांनी ही आदर्श गणेश मूर्ती तयार केली आहे.
दरवर्षी दहा ते पंधरा हजार रुपयाची गणेश मूर्ती या अगोदर मंडळ घेत असे मात्र यावर्षी युवा वर्गानी पुढाकार घेऊन मूर्तीच्या किमतीत ९०% बचत घडून आणली. ही पर्यावरणपूरक कागदाची गणेश मूर्ती साकरताना अकराशे रुपये खर्च आला असून गणेश मूर्तीच्या हातात ‘एक मराठा लाख मराठा यंदा तरी मराठा समाजाला आरक्षण मिळू दे’ अशी मराठा आरक्षणाच्या मागणीची विनवणी बाप्पाकडे केली आहे.
ML/KA/SL
19 Sept. 2023