परदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीत केली 22,038 कोटी रुपयांची गुंतवणूक

 परदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीत केली 22,038 कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची (एफपीआय) (Foreign portfolio investors) भारतीय बाजारातील जोरदार गुंतवणूक सुरुच आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी 1 फेब्रुवारीला सादर केलेल्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पावर (Budget 2021-22) एफपीआयकडून खुपच सकारात्मक भूमिका पहायला मिळाली आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत भारतीय बाजारात 22,038 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये आतापर्यंत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (Foreign portfolio investors) समभागांमध्ये 20,593 कोटी रुपये आणि डिबेंचर मध्ये 1,445 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अशा प्रकारे 1 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत निव्वळ गुंतवणूक 22,038 कोटी रुपये झाली आहे. त्याआधी जानेवारीत एफपीआयने भारतीय बाजारात 14,649 कोटींची निव्वळ गुंतवणूक केली होती.
डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (Foreign portfolio investors) भारतीय बाजारात याआधी ऑक्टोबर 2020 मध्ये 22,033 कोटी रुपये, नोव्हेंबर 2020 मध्ये 62,951 कोटी आणि डिसेंबर 2020 मध्ये, 68,558 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मॉर्निंगस्टार इंडियाचे सहाय्यक संचालक (व्यवस्थापक संशोधन) हिमांशु श्रीवास्तव यांनी फेब्रुवारी महिन्यातील एफपीआयच्या दमदार गुंतवणूकीमागे केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात निर्माण झालेली सकारात्मक भावना असल्याचे सांगितले. श्रीवास्तव म्हणाले की अर्थव्यवस्था (Economy) पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारने सर्वसाधारण अर्थसंकल्पात केलेल्या प्रयत्नांचे गुंतवणूकदारांकडून कौतुक झाले आहे.
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले की, बाजारपेठेत सध्या गुंतवणूकीसाठी क्षेत्रांची अदला बदल होत आहे. 2020 मध्ये फार्मा क्षेत्र हा एक पसंतीचा पर्याय होता आणि या क्षेत्राने चांगली कामगिरी केली, तर संभाव्य अनुत्पादित मालमत्तांच्या (Non performing assets) चिंतेमुळे बँकिंग समभागांची कामगिरी चांगली झाली नव्हती. विजयकुमार म्हणाले की, आता एफपीआयकडून बँकिंग समभागांची पुन्हा मागणी होऊ लागली आहे.
PL/KA/PL/15 FEB 2021

mmc

Related post