पालिकेच्या ई-वॉर्डातील ‘एआय वॉल्ट’मध्ये जन्म-मृत्यू, विवाह नोंदी काही सेकंदांत उपलब्ध होणार
मुंबई, दि १५: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई-वॉर्डातील जन्म-मृत्यू, विवाह नोंदींसह महत्त्वाच्या नागरी दस्तऐवजांचे आता अत्याधुनिक ‘व्हिजन एआय वॉल्ट’ प्रणालीअंतर्गत डिजिटल जतन करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित या उपक्रमामुळे नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे अवघ्या काही सेकंदांत उपलब्ध होणार असून, जुन्या अभिलेखांचे सुरक्षित संवर्धनही शक्य होणार आहे. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) अश्विनी जोशी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
ई-वॉर्ड कार्यालयात अनेक दशकांपासून जतन करण्यात आलेल्या हस्तलिखित नोंदींवर काळाचा परिणाम दिसू लागला होता. काही दस्तऐवजांवरील शाई फिकी पडली होती, तर अनेक नोंदी जीर्ण अवस्थेत होत्या. अशा परिस्थितीत एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने या अभिलेखांचे स्कॅनिंग, वर्गीकरण आणि डिजिटल संग्रहण करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, ही प्रणाली केवळ पारंपरिक ओसीआर तंत्रज्ञानापुरती मर्यादित नसून, वळणदार इंग्रजी, मराठी आणि हिंदी हस्तलिखित लिपी अचूकपणे वाचण्यास सक्षम आहे. तसेच पुसट झालेली अक्षरे स्पष्ट करणे, शाईचे डाग दूर करणे आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील नाजूक दस्तऐवजांचे पुनरुज्जीवन करण्याची क्षमता या प्रणालीत आहे.
पूर्वी एखादे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना ३० दिवसांपासून ते काहीवेळा दीड वर्षांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र आता नागरिकाने फक्त संबंधित व्यक्तीचे नाव टाइप करताच एआय प्रणाली काही क्षणांत नोंद शोधून काढणार आहे. त्यानंतर मूळ अभिलेखाचे पान स्क्रीनवर उपलब्ध होईल आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्र तत्काळ तयार केले जाईल.
डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढेल. तसेच बोगस प्रमाणपत्रांना आळा बसण्यास मदत होईल. ही सुविधा वापरणारी बृहन्मुंबई महानगरपालिका देशातील पहिली महानगरपालिका ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला.
उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘ई’ विभागाचे सहायक आयुक्त आनंद कंकाळ यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.KK/ML/MS