मुंबईकरांना मिळणार ‘डिजीलॉकर’ विवाह नोंदणी प्रमाणपत्र

 मुंबईकरांना मिळणार ‘डिजीलॉकर’ विवाह नोंदणी प्रमाणपत्र

मुंबई , दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महापालिकेने मुंबईकरांच्या सेवेमध्ये आणखी एक ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली असून केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचा उपक्रम असलेल्या ‘डिजीलॉकर’ या ऑनलाईन शासकीय व अधिकृत कागदपत्रांच्या ऍपमध्ये आता मुंबईकर नागरिकांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करुन जतन करता येईल. महापालिकेकडे २८ जानेवारी २०१६ नंतर विवाह नोंदणी केलेल्यांना ही सुविधा मिळणार आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र हा विवाहितांसाठी महत्वाचा वैयक्तिक दस्तऐवज समजला जातो. पासपोर्ट, व्हिजा आणि इतर अनेक शासकीय कामकाजासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची गरज भासते. महापालिकेकडे सन २०१० पासून विवाह नोंदणी प्रमाणपत्र विषयक कामकाज सुरु झाले असले तरी जानेवारी २०१६ पासून विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचे कामकाज ऑनलाईन करण्यात आले. त्याच्या पुढे जावून आता महापालिकेकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र डिजीलॉकरमध्ये देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रत्यक्ष बाळगण्याची गरज भासणार नाही. विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचे कामकाज ऑनलाईन झाल्याच्या तारखेपासून म्हणजे २८ जानेवारी २०१६ नंतर महापालिकेकडे विवाह नोंदणी केलेल्यांना ही सुविधा मिळणार आहे. विवाहाचे वर्ष कोणतेही असले तरी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर हे प्रमाणपत्र उपलब्ध होते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अशा रितीने आजपर्यंत महापालिकेकडे वैवाहिक नोंदणीची संख्या तीन लाख ८० हजार ४९४ इतकी आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त आश्विनी भिडे म्हणाल्या की, डिजी लॉकर ही केंद्र सरकारद्वारे उपलब्ध करुन दिलेली शासकीय कागदपत्र मिळवण्याची ऑनलाईन व पेपरलेस सेवा आहे. या सेवेचा उद्देश नागरिकांना मोबाईलमध्येच ऍपद्वारे त्यांच्या वैयक्तिक दस्तऐवजासाठी इलेक्ट्रॉनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे. डिजीलॉकरमधील शासकीय कागदपत्रांना प्रत्यक्ष कागदपत्रांइतकाच अधिकृत व कायदेशीर दर्जा असतो. स्वाभाविकच, डिजीलॉकरमध्ये शासनाने उपलब्ध करुन दिलेले दस्ताऐवज पेपरलेस स्वरुपात कुठेही, कधीही व सुरक्षितपणे उपलब्ध होवू शकतात. अशी कागदपत्र प्रत्यक्ष बाळगण्याची गरज शिल्लक राहत नाही. त्यामुळे डिजीलॉकरची लोकप्रियता व सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपयुक्तता प्रचंड आहे. विवाह प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेचे डिजिटायझेशन करून नागरिकांवरील ओझे कमी करून त्यांना या महत्त्वाच्या कागदपत्रापर्यंत पोहोचणे सोपे व्हावे, हा महापालिकेचा उद्देश आहे, असे भिडे यांनी नमूद केले.

ML/KA/PGB 29 Mar 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *