धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समिती स्थापन
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून राज्यातल्या विविध ठिकाणी धनगर समाज बांधव मोर्चे आंदोलने करत आहेत. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून (अनुसूचित जमाती) आरक्षण मिळण्याच्या मागणीने जोर धरला आहे. याचीच दखल घेऊन राज्य सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महापालिकेचे अतिरक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत नऊ जणांचा समावेश करण्यात आला आहे.
समिती अध्यक्ष आणि सदस्य
१) सुधाकर शिंदे- (समितीचे अध्यक्ष)- सध्या मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त
२) दे.आ.गावडे-सदस्य सचिव तथा विभागाचे प्रतिनिधी- सध्या सह सचिव इतर मागास बहुजन कल्याण
३) संतोष वि गावडे- सदस्य- सध्या उपसचिव महसूल विभाग, मंत्रालय मुंबई
४) धनंजय सावळकर- सदस्य- सध्या अप्पर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन, महानिर्मिती)
५) जगन्नाथ महादेव वीरकर-सदस्य- सध्या अप्पर जिल्हाधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक सिडको
६) जे.पी. बघेळ-अशासकीय सदस्य
७) अॅड. एम.ए. पाचपोळ-अशासकीय सदस्य
८) माणिकराव दांडगे पाटील-अशासकीय सदस्य
९) इंजि. जी.बी. नरवटे-अशासकीय सदस्य
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी या समितीला मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा या राज्यात जाऊन अभ्यास करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. येत्या तीन महिन्यात या समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहेत.
धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून धनगर समाजातील नेत्यांचं चौंडी येथे उपोषण सुरू होतं. हे उपोषण सोडण्यात यावं म्हणून आवाहनही करण्यात आलं होतं. पण धनगर समाज उपोषणावर ठाम होता. अखेर सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार राम शिंदे यांनी चौंडीत येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांना शासन निर्णयाची प्रत देऊन त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. या संदर्भात योग्य तो विचार करून निर्णय घेणार असल्याची बाळासाहेब डोलतडे यांनी सांगितलं.
SL/KA/SL
20 Nov. 2023