‘छावा’ चा ट्रेलर वादाच्या भोवऱ्यात

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट मांडणाऱ्या “छावा” या चित्रपटाच्या ट्रेलरने अगदी काही तासांतच लाखो व्हूज मिळवले आहे. यात बहुआयामी अभिनेता विकी कौशल याने संभाजी राजांची भूमिका साकारली आहे तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मीका मंदनाने महाराणी येसूबाईंची भूमिका केली आहे. मराठ्या रणसंग्राम आणि शंभूराजांचे बलिदान दाखवणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शीत हा भव्य चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. मात्र नुकताच प्रसिद्ध झालेला याचा ट्रेलर वादात सापडला आहे.
यामध्ये शंभूराजे आणि महाराणी येसूबाई लेझीम खेळताना दिसत आहेत तर एका दृष्यात शंभूराजे नृत्य करताना दिसत आहेत.यावर काही चाहते नाराज झाले आहेत. शिवरायांची आणि शंभूराज्यांची भूमिका अजरामर करणारे अभिनेते अमोल कोल्हे यांनी मात्र यावर प्रतिक्रीया देताना, राजांना लेझिम खेळताना दाखवणे काही गैर नाही असे म्हटले. हा मराठमोळा पारंपरिक खेळ असल्याने ती सिनेमॅटीक लिबर्टी दिग्दशकाने घेतली असल्यास काही वावगे नाही असे त्यांनी म्हटले आहे.
तर कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी राज्यातील इतिहास अभ्यासकांना दाखवावा आणि काही वावगे नाही ना याची खात्री करून घ्यावी असे म्हटले आहे. मात्र त्यांनीही शंभुराजेच्या लेझीम दृष्यावर काही आक्षेप नसल्याचे म्हटले आहे.
SL/ML/SL
24 Jan. 2025