आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट ,आठ ठार, पाच जखमी

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भंडारा जिल्ह्यात शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात आज सकाळी झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचावकार्यासाठी एसडीआरएफ तसंच नागपूर महानगरपालिकेचा चमू दाखल झाला आहे. संरक्षण दलासोबतच जिल्हा प्रशासनही समन्वयानं मदतकार्यात सहभागी झालं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
या कंपनीत दारुगोळा निर्मितीचं काम केलं जातं. सकाळी ११ च्या सुमाराला LTCE – 23 या इमारतीत झालेल्या या स्फोटात इमारत पूर्णत: उद्ध्वस्त झाली. या स्फोटामुळे अंदाजे १० किलोमीटर अंतरापर्यंत घरांना हादरे बसले.
स्फोट झालेल्या कारखान्यात चाचणी सुविधा व आधुनिक प्रयोगशाळा आहे. याठिकाणी भारतीय लष्करासाठी अनेक प्रकारची उत्पादने तयार केली जातात. यात अॅसिडपासून अनेक प्रकारच्या स्फोटकांचा समावेश आहे. या स्फोटात ही चाचणी सुविधा व प्रयोगशाळेचे काही नुकसान झाले का? हे तपासले जात आहे.
ML/ML/PGB 24 Jan 2025