माकड पकडा, 600 रुपये कमवा – राज्य सरकार देणार मानधन
मुंबई, दि. २७ : लोकप्रतिनिधींनी वारंवार केलेल्या मागण्यांची दखल घेत, महाराष्ट्र सरकारने वन विभागाच्या शासन निर्णयाद्वारे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता शहरी भागात आलेली त्रासदायक माकडे आणि वानरांना सुरक्षितपणे पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी प्रति माकड अथवा वानर यांच्यामागे 600 रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. या नव्या निर्णयामुळे जुन्या आर्थिक मापदंडांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, यामुळे वन्यजीव व्यवस्थापनाला गती मिळण्यासोबतच संघर्षग्रस्त भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र असाच निर्णय ग्रामीण भागात पिकांची नासाडी करणाऱ्या माकड. वानरांना पकडण्यासाठी का घेतला गेला नाही? असाही प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहे.
नुकत्याच झालेल्या शासन निर्णयानुसार शहरी भागांत उपद्रव ठरणाऱ्या रिझस मकाक आणि हनुमान लंगूर या प्रजातींच्या वानरांना सुरक्षित जाळे किंवा पिंजऱ्यांच्या साहाय्याने जेरबंद केले जाणार असून, प्रत्येक वानराची छायाचित्रासह अधिकृत नोंद ठेवली जाईल. पकडलेल्या या वानरांना मानवी वस्तीपासून किमान 10 किलोमीटर दूर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार असून, यामुळे वन्यजीवांचे संरक्षण आणि मानवी वस्त्यांमधील सुरक्षितता सुनिश्चित केली जाणार आहे.
राज्य सरकारच्या या नवीन शासन निर्णयानुसार सुधारित दररचना तात्काळ लागू करण्यात आली असून इतर जुन्या अटी कायम ठेवण्यात आल्या आहेत. मात्र मानवी वस्तीत धुमाकूळ घालणाऱ्या माकडांना पकडण्याचे काम अत्यंत आव्हानात्मक आणि जोखमीचे असताना त्यासाठी निश्चित करण्यात आलेला 600 रुपयांचा दर पुरेसा आहे का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहेत.
SL/ML/SL