तिरंग्यावर दिला नाश्ता, पोलिसांनी केली कारवाई

संग्रहित छायाचित्र
प्रयागराज, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोट्यवधी भारतीयांच्या ह्रदयात मानाचे स्थान असलेला आपला तिरंगा राष्ट्रध्वज आपण प्राणपणाने जपतो. हजारो क्रांतिकारकांची प्रेरणा राहिलेल्या या तिरंगा ध्वजाचा अपमान झाल्याची एक संतापजनक घटना समोर आली आहे. देशभर स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात सुरू असताना उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे एका मदरशात तिरंग्यावर नाश्ता ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या संदर्भातला फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. एका नेटकऱ्याने हा फोटो मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, डीजीपी, यांच्यासह अनेकांना टॅग केला. तसंच कारवाईची मागणी केली. हा फोटो समोर आल्याने गदारोळ झाला होता.
व्हायरल फोटोच्या आधारे पोलिसांनी मदरसा प्रमुखासह चार जणांच्या विरोधात राष्ट्रध्वजाच्या अपमानाचा गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय ध्वज अपमान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये प्राथमिक तपास सुरु करण्यात आला आहे. ही घटना गौसिया इस्लामिया जिंतुल उलूम या मदराशात घडली आहे असं सांगितलं जातं आहे. होलागढ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा भाग येतो. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंगा अंथरुन त्यावरच नाश्ता दिला गेल्याचा हा फोटो आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोकांनी आंदोलन केलं. हा गोंधळ इतका वाढला की पोलिसांना पाचारण करावं लागलं. या ठिकाणी पोलीस आल्यानंतर त्यांनी आंदोलन करणाऱ्यांना कारवाईचं आश्वासन दिलं आणि मदरसा प्रमुखासह चार जणांवर गुन्हा दाखल केला. नवभारत टाइम्सने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
SL/KA/SL
18 Aug 2023