बायोगॅस प्रकल्पामुळे मुंबई होणार कचरामुक्त

 बायोगॅस प्रकल्पामुळे मुंबई होणार कचरामुक्त

मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क):मुंबईतील कचऱ्याची समस्या मार्गी लागावी,शहरातील प्रदूषण कमी व्हावे यासाठी पालिका आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्यात कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार झाला असून, कचऱ्यापासून तयार होणारा हा बायोगॅस मुंबईला प्रदूषणापासून मुक्त ठेवणार, असा आशावाद राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तसेच मुंबई महापालिका आणि महानगर गॅसने हाती घेतलेल्या या प्रकल्पामुळे लवकरच मुंबईतील हजारो टन कचऱ्याची समस्या मार्गी लागणार आहे. यासोबत मुंबईकरांना पर्यावरणपूरक बायोगॅसही वापरासाठी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री व पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. महापालिका आणि महानगर गॅस कंपनी दरम्यान बायोगॅस संयंत्र प्रकल्प स्थापन करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. दीपक केसरकर यावेळी म्हणाले कि पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बायोगॅस हा योग्य पर्याय आहे. स्वच्छ आणि सुंदर मुंबईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालिका प्रयत्नशील असून . या प्रयत्नांना मुंबईकरांनीही जोड द्यायला हवी. त्यासाठी प्रत्येकाने ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करायला हवे. गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा. तसेच या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांनाही सामावून घ्या. जणेकरून शाळेतच मुलांमध्ये जनजागृती केली तर हा विषय घरोघरी पोहोचेल, असे त्यांनी नमूद केले.यावेळी मंगल प्रभात लोढा म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने देशात सर्वत्र पर्यावरण संवर्धन उपक्रमांवर भर दिला जात आहे. आधुनिक, हरित आणि पर्यावरण पूरक इंधनाचे पर्याय स्वीकारून पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी केले जात आहे. महाराष्ट्र शासन देखील राज्यात सौर ऊर्जा, हरित ऊर्जा यावर जोर देत आहे. या शृंखलेतील हा बायोगॅसचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर आपण भविष्यातील आधुनिक मुंबई पाहणार आहोत. कचऱ्याची समस्या मार्गी लागणार आहे, तसेच प्रदूषण कमी होवून नागरी आयुर्मान देखील सुधारणार आहे. त्यामुळे मुंबईची नव्या दिशेने वाटचाल होईल, असे त्यांनी नमूद केले.*असा आहे प्रकल्प *मुंबई महानगरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल येथील वाया गेलेले अन्न आणि मोठ्या भाजी मंडईतील वाया गेलेला भाजीपाला संकलित करण्यात येणार आहे. त्यानंतर या जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी दररोज लागणारा जैविक कचरा महापालिकेकडून खास वाहनातून पुरविला जाणार आहे. कचऱ्याचे संकलन, पृथक्करण आणि वितरण अशी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.*तीन टप्प्यांत सुरू होणार प्रकल्पाचे काम*बायोगॅस प्रकल्प प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीन टप्प्यांत या प्रकल्पाचे काम सुरू राहणार आहे. त्यात जैविक कचरा प्रक्रिया प्रकल्प, सेंद्रिय खत उत्पादन संयंत्र आणि हरित इंधन उत्पादन संयंत्र या टप्प्यांचा समावेश असेल. या प्रकल्पाद्वारे उत्पादित केलेला जैविक वायू बृहन्मुंबईच्या हद्दीत वापरला जाणार आहे. या प्रकल्पासाठी जैविक कचरा देण्याचे नियोजन सुरू केल्याची माहिती उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी दिली.

ML/KA/PGB 6 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *