‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन
लातुर, दि. २१ : लातूरमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाची छाप सोडणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे सर्वेसर्वा आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. डॉ. गोपाळराव पाटील हे मूळचे बालरोगतज्ज्ञ होते. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करताना अनेक रुग्णांना आधार दिला. विशेषतः ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी ते ‘देवदूत’ ठरले होते.
वैद्यकीय सेवेसोबतच त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही सक्रिय भूमिका बजावली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा महत्त्वाचा आधार आहे, याची जाणीव ठेवून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे काम उभे केले. शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयाला राज्यातच नव्हे, तर देशभरात एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच लातूरच्या ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा जागतिक स्तरावर झाली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये आणि गुणवत्तेच्या बाबतीत मागे राहू नये, यासाठी त्यांनी आयुष्यभर झटले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
SL/ML/SL