कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दूध खरेदी दरात मोठी कपात
कोल्हापूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभेचा निकाल लागून दोन दिवस उलटत नाहीत तोच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पिळवणूकीला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. दूध उत्पादक संघांनी प्रति लिटर ३ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतल्याने दूध उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे २१ नोव्हेंबरपासून या दराची अंमलबजावणी करण्याचा निर्णय खासगी व सहकारी दूध संघ संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.कोल्हापूर व सांगली जिल्ह्तील खाजगी व सहकारी दूध संघटनेच्या दूध संघांच्या प्रतिनिधींची बैठक कोल्हापूर मध्ये पार पडली. या बैठकीत गायीच्या दुधाच्या खरेदी दरात ३ रुपयांची कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
महाराष्ट्र सरकारचा ऑक्टोबरपासून गाय दूध खरेदीचा ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता किमान प्रतिलिटर दर २८ रुपये आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात इतर संघ २७ ते २८ रुपये दराने गायीचे दूध खरेदी करत आहेत. परंतु, फक्त कोल्हापूर जिल्ह्यात ३३ रुपये दराने दूध खरेदी केले जाते. हा फरक ६ रुपये जास्त आहे. त्यामुळे लोणी, दूध भुकटी याची उत्पादन किमत जास्त येते असल्याने बाजारामध्ये त्याची स्पर्धात्मक दराने विक्री करू शकत नाही. सध्या गाय व म्हैशीचे दूध उत्पादन मुबलक प्रमाणात होत असल्याने अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोकुळ, ‘वारणा’ व ‘राजारामबापू’ या सहकारी संघासह पश्चिम महाराष्ट्रातील खासगी दूध संघांनी गाय दुध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात केली आहे. ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ.चे दूध ३० रुपये लिटरने खरेदी केले जाणार आहे.
SL/ML/SL
25 Nov. 2024