वैष्णोदेवी रोपवे प्रकल्पाविरोधात स्थानिकांचे आंदोलक
श्रीनगर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील प्रसिद्ध देवस्थान ठिकाणी पोहोचणे सुलभ व्हावे म्हणून केंद्र सरकारकडून प्रवास सुविधा विकसित करण्यावर भर देत आहे. मात्र यामुळे स्थानिकांना मिळणाऱ्या रोजगारावर परिणाम होणार असल्याने स्थानिकांकडून अशा कामांना विरोध होताना दिसतो. काश्मिरमधील प्रसिद्ध वेष्णोदेवी मंदिराला दरवर्षी लाखोलोक भेट देतात त्यामुळे तेथील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. मात्र आता येथे रोपवे उभारण्यात येणार असल्याने स्थानिकांच्या रोजगारावर मोठा परिणाम होणार आहे. सध्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी भाविकांना चढून जाण्यासाठी 6-7 तास लागतात. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भाविकांसाठी अवघा 1 तास लागणार आहे. रोपवे एका तासात 1000 लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास सक्षम असेल.
रोपवे विरोधात येथे गेल्या चार दिवसांपासून प्रखर आंदोलन सुरु आहे. जम्मू-काश्मीरमधील कटरा येथील वैष्णोदेवी रोपवे प्रकल्पाविरोधात सोमवारी स्थानिक दुकानदार आणि मजुरांनी सलग चौथ्या दिवशी आंदोलन केले. आंदोलकांनी श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली. या चकमकीत एक पोलिस जखमी झाला. आंदोलकांनी प्रथम दंडाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध रॅली काढली. त्यानंतर शालिमार पार्कबाहेर आंदोलन केले. वास्तविक वैष्णोदेवी दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांसाठी शालिमार पार्कमध्येच बेस कॅम्प बनवण्यात आला आहे.
भाविकांना मंदिरापर्यंत नेण्यासाठी रोपवे प्रकल्पामुळे सध्याच्या मार्गावरील स्थानिक दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम होईल, असा आंदोलकांचा आरोप आहे. 250 कोटी रुपये खर्चून हा नवीन प्रकल्प उभारण्यात येत असल्याचे पालखी आणि घोड्यावरून भाविकांना मंदिरात नेणाऱ्या व्यापाऱ्यांनी सांगितले. त्याचे काम झाल्यानंतर भाविक रोपवेने जातील. आमची रोजीरोटी हिसकावून घेतली जाईल.
कामगार संघटनेचे अध्यक्ष भूपिंदरसिंग जामवाल आणि शिवसेनेचे (यूबीटी) प्रदेशाध्यक्ष मनीष साहनी हे देखील निदर्शनात सहभागी झाले होते. रोपवे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकाला 20 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय बाधित लोकांसाठी पुनर्वसन योजना तयार करण्यासही सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रदर्शनाव्यतिरिक्त दुकानदार आणि घोडेवाल्यांनी 3 दिवसांच्या संपाची घोषणा केली होती. 22 नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा संप आता आणखी एक दिवस वाढवण्यात आला आहे.
SL/ML/SL
25 Nov. 2024