फसव्या जाहिरातीप्रकरणी बाबा रामदेव मागणार जनतेची माफी

 फसव्या जाहिरातीप्रकरणी बाबा रामदेव मागणार जनतेची माफी

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनावरील औषधे देणारी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी अडचणीत आलेले पतंजली आयुर्वेदाचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी जनतेची माफी मागण्याची तयारी दाखवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना यासाठी एका आठवड्याची मुदत दिली असून या प्रकरणी पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे. पतंजलीच्या जाहिराती प्रकरणात आज नव्यानं सुनावणी झाली. यावेळी बाबा रामदेव यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी रामदेव यांच्या वतीनं माफीचा प्रस्ताव ठेवला. करोनाचा सामना करण्यासाठी आमच्याकडं पर्यायी औषध आहे, असा दावा आम्ही केला होता. जे घडलं, ते चुकीचं होतं याचं आम्हाला दु:ख आहे. त्याबद्दल आम्हाला खेद व्यक्त करायचा आहे, असं रोहोतगी म्हणाले.

न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी बाबा रामदेव यांना हिंदीत विचारलं, ‘तुम्ही जे काही केलं, ते तुम्ही न्यायालयाच्या विरोधात केलं. ते बरोबर आहे का?’ त्यावर उत्तर देताना रामदेव म्हणाले, ‘न्यायाधीश साहेब, झालेल्या चुकीसाठी मी बिनशर्त माफी मागतो.’ त्यावर न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी रामदेव बाबांच्या वृत्तीवर बोट ठेवलं. पत्रकार परिषद घेऊन ॲलोपॅथीवर प्रश्न उपस्थित करण्याच्या रामदेव यांच्या कृतीवर त्यांनी आक्षेप व्यक्त केला. आपल्या देशात प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. केवळ आयुर्वेदिक औषधं वापरली जातात असं नाही, असं कोहली यांनी सुनावलं.

कोरोनील औषधानं कोरोना बरा होतो असं सांगणारी शेवटची जाहिरात फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झाली होती. मात्र, त्याआधीच तुम्हाला न्यायालयानं ताकीद दिली होती. तरीही ही जाहिरात का प्रसिद्ध केली गेली, असा प्रश्न न्यायाधीशांनी केला. त्यावर रामदेव बाबा गोंधळले. ‘आम्हाला कायदा इतका कळत नाही. यापुढं आम्ही हे लक्षात ठेवू आणि अशा चुका होणार नाहीत.आचार्य बाळकृष्ण यांनीही ही चूक झाल्याचं मान्य केलं. ’कायदेशीरदृष्ट्या आम्ही ते करायला नको होतं. यावर न्यायमूर्ती अमानुल्ला यांनी बाळकृष्ण यांना फटकारलं. ‘स्वत:ची जाहिरात करताना तुम्ही इतर कोणाकडं बोट दाखवू शकत नाही. तुम्ही दुसऱ्याचा अपमान कसा करू शकता?,’ असा सवाल अमानुल्ला यांनी केला.

SL/ML/SL

16 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *