हुलुनबुईर,चीन,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाने आपली विजयी कामगिरी सुरुच ठेवली आहे. एशियन हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज गतविजेत्या भारताने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. हा सामना हुलुनबुईर येथील मोकी हॉकी प्रशिक्षण तळावर खेळला गेला. या हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा हा सलग पाचवा विजय आहे. भारताचे दोन्ही गोल कर्णधार हरमनप्रीत सिंगने केले. पाकिस्तानकडून अहमद नदीमने गोल केला. या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ आतापर्यंत अपराजित आहे. संघाने सर्व 5 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तान 5 पैकी 2 सामने जिंकून गुणतालिकेत भारतानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघ आधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पाकिस्तानवरचा हा 8वा विजय आहे. दोन्ही संघांमधील हा 12 वा सामना होता. या काळात पाकिस्तानला केवळ 2 सामने जिंकता आले आहेत. 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.
सामन्यादरम्यान पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. सामन्यातील पहिला गोल पाकिस्तानच्या अहमद नदीमने पहिल्या क्वार्टरच्या 7व्या मिनिटाला केला. येथे शाहीनने शॉट खेळत असताना चेंडू डीच्या आत टाकला, जो नदीमने डिफ्लेक्ट करून गोल केला. यासह पाकिस्तानने या सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. यानंतर 13व्या मिनिटाला भारताने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत बरोबरी साधली. हरमनप्रीत सिंगने गोलपोस्टच्या उजव्या कोपऱ्यावर ड्रॅग फ्लिकसह गोल केला.
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला (19व्या मिनिटाला) कर्णधार हरमनप्रीतने भारताला आघाडी मिळवून दिली. अभिषेकच्या इंजेक्शनवर हरमनप्रीतने गोलपोस्टच्या मध्यभागी शॉट घेतला. हे गोल निर्णायक ठरले.
या स्पर्धेत भारतासह चीन, कोरिया, जपान, मलेशिया आणि पाकिस्तान हे संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेची उपांत्य फेरी 16 तारखेला तर अंतिम फेरी 17 सप्टेंबरला होणार आहे.
एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 13 वर्षांपूर्वी 2011 मध्ये सुरू झाली होती. भारतीय हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा गतविजेता आहे. भारताने चार वेळा तर पाकिस्तानने तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर 2021 मध्ये दक्षिण कोरियाने विजेतेपद पटकावले होते.
SL/ML/SL
14 Sept 2024