दिवाळी संपताच राज्यात प्रचाराचे फटाके : मोदी, गांधींच्या सभा
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीच्या चार दिवसात थंडावलेला राजकीय पक्षांचा जाहीर प्रचार येत्या आठवड्यात पुन्हा सुरू होणार असून वरिष्ठ नेत्यांच्या ॲटम् बॉम्ब , सुतळी बॉम्ब , डांबरी फटाक्यांनी पुन्हा एकदा प्रचाराचा धडाका पार पडणार आहे.
भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शनिवार 9 नोव्हेंबर रोजी अकोला दौऱ्यावर येणार असून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानात नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने महायुतीच्या वतीने विविध समित्या गठीत करण्यात आले आहेत.
तर ओबीसी युवा मंच अधिकार मंच तसेच राज्यातील अन्य सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व नागपूरातील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये येत्या 6 नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी 11 वाजता संविधान संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांनी आज नागपूरात प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. सदरचा कार्यक्रम हा पूर्णपणे अराजकीय असून कुठलेही राजकीय स्वरूप या कार्यक्रमाला नाही असे देखील त्यांनी सांगितले .असे असले तरी राज्यात निवडणुका असताना राजकीय नेते राजकीय धडाका लावतील यात शंकाच नाही.