पीएम किसान योजनेच्या १७ व्या हफ्त्याला मंजुरी
नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी कार्यालयात पोहोचून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांनी पीएम किसान निधीच्या संबंधित फाइलवर पहिली स्वाक्षरी केली. आज त्यांनी पंतप्रधान म्हणून पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे. मोदी यांनी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होणार आहेत. दरम्यान फाइलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आपले सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. मोदी म्हणाले, “आमचे सरकार शेतकरी कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यावर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. भविष्यात आम्हाला शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी मोठे काम करायचे आहेत.
रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल पीएम किसान फंडच्या निधी संबंधित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधीचा १७ वा हप्ता मंजूर केला असून या फाइलवर आज स्वाक्षरी केली. या निर्णयाचा देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यासाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे.
१ डिसेंबर २०१८ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाकडून दरवर्षी ६००० रुपयांची रक्कम दिली जाते. प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. जी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते. सुरुवातीला या योजनेंतर्गत केवळ २ हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळत होता, परंतु आता देशातील सर्व शेतकरी पंतप्रधान सन्मान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
SL/ML/SL
10 June 2024