NEET परीक्षेचा निकाल रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

 NEET परीक्षेचा निकाल रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ४ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या NEET परीक्षेच्या निकालाबाबत मोठ्या प्रमाणावर आक्षेप नोंदवले जात आहेत. या परीक्षेमध्ये काही उमेदवारांना पैकीच्या पैकी गुण मिळाले, यापैकी बरेचरे उमेदवार एकाच परीक्षाकेंद्रावर परीक्षा देत होते. काही परीक्षा केंद्रावर उमेदवारांना पेपर सोडवण्यासाठी पूर्ण वेळ देण्यात आला नाही. या उमेदवारांना Compensatory गुण देण्यात आले. NTA च्या या निर्णयालाही विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला त्यानंतर आता वादग्रस्त ठरलेल्या नीट निकालाविरोधात देशातील जवळपास २० हजार विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेत नीट पुन्हा घेण्यात यावी किंवा श्रेणी गुण पद्धत रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घाई-गडबडीत जाहीर केलेला नीटचा निकाल वादग्रस्त ठरला आहे. या निकालाबाबत विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कोटा येथील मोशन एज्युकेशन संस्थेने नीट परीक्षेतील गैरप्रकारांबाबत डिजिटल सत्याग्रह सुरु केला आहे.

या सत्याग्रहात २० हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या सत्याग्रहाचा एक भाग म्हणून कोटा येथील शिक्षणतज्ज्ञ नितीन विजय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नीट परीक्षेत ६७ विद्यार्थी हे प्रथम क्रमांकावर आहेत. नीटच्या परीक्षेत नकारात्मक गुण पद्धत असल्याने सर्व प्रश्न सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न चुकला तरी त्याला ७२० पैकी ७१५ गुण मिळणे अपेक्षित आहे. मात्र विद्यार्थ्यांना ७१८, ७१९ गुण कसे दिले गेले, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.

ML/ML/SL

10 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *