संतप्त महिलांनी केले दारू दुकान उध्वस्त….
नंदुरबार, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातल्या आदिवासीबहुल वडजाखन गावातील महिला बचत गट सदस्यांनी गावातील अवैध मद्य व्यवसायावर बंदी यावी यासाठी आंदोलन केले. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेऊन त्यांनी निषेध नोंदविला.
एवढ्यावरच न थांबता संतप्त महिलांनी दारूच्या दुकानातील साहित्य व अवैध हातभट्टी दारू बनवण्याचे साहित्य जमा करून ग्रामपंचायत समोर जाळून होळी केली. वारंवार मागणी करूनही गावात अवैधरीत्या चालणाऱ्या मद्य व्यवसायाला पायबंद घातला जात नाही म्हणून संतप्त महिलांनी हे पाऊल उचलले आहे.
दारूच्या व्यसनामुळे गावातील सामाजिक, कौटुंबिक वातावरण खराब होत असल्यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत. गावात दारूबंदी व्हावी यासाठी महिला बचत गट व सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी पोलीस विभाग तसेच प्रशासनाला वारंवार विनंती करूनही अवैध दारूचे धंदे बंद केले जात नव्हते. पुरुष व युवकांच्या मद्याच्या व्यसनाने अवघे गाव त्रस्त झाले होते, म्हणून धीर सुटल्याने शेवटी संतप्त महिला बचत गटाच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन गावात सुरू असलेले हातभट्टी दारूचे दुकान बंद करून, तेथील साहित्य जाळून खाक केले.
महिला बचत गटाच्या या कारवाईने अवैध दारूभट्टी व अवैध मद्य विक्री करणारे चांगलेच धास्तावले आहेत. जो पर्यंत गावात पूर्णपणे मद्य बंदी करण्यात येत नाही तो पर्यंत ही कारवाई सुरु राहील असा निर्धार गावातील महिलांनी व्यक्त केला आहे.
ML/KA/SL
2 Feb. 2023