शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ…

बुलडाणा दि २– विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी आज विठ्ठल विठू नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल दर्शनासाठी मार्गस्थ झाली आहे . टाळकरी वारकरी पताकाधारी
टाळ मृदंग घेऊन अश्व आणि गजासह 700 जण पायदळवारीमध्ये सहभागी झाले आहेत.
पालखीचे हे 56 वे वर्ष आहे. संत गजानन महाराजांची पालखी 725 किलोमीटरचा पायी प्रवास करून 33 दिवसानंतर 4 जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होणार आहे. लहानांपासून ते वयोवृद्ध वारकरी या पालखीमध्ये सहभागी झाले आहेत.
आज 2 जून रोजी सकाळी सात वाजता शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या रजत मुखवट्याची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर संस्थांचे विश्वस्त नीलकंठ पाटील यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर शेगाव येथे आलेल्या भाविकांनी संत गजानन महाराजांच्या मुखवट्याचे दर्शन घेतले. मंदिरातून निघालेली ही पालखी आज श्री क्षेत्र नागझरीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. पालखीसोबत पायी चालत अनेक भाविक पालखीत सहभागी झाले होते.