डिजिटल डिटॉक्स – तुमच्या आयुष्याचा नवा आरंभ

 डिजिटल डिटॉक्स – तुमच्या आयुष्याचा नवा आरंभ

जितेश सावंत*
आजच्या आधुनिक युगात इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि विविध डिजिटल उपकरणांनी आपले जीवन व्यापून टाकले आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपले जीवन अधिक सोयीचे, वेगवान झाले आहे. मात्र, या डिजिटल साधनांचा अतिरेक आपल्याला मानसिक, सामाजिक आणि शारीरिकदृष्ट्या हानी पोहोचवत आहे.
आपलं जीवन तंत्रज्ञानाशी इतकं घट्ट जोडलेलं आहे की सकाळी डोळे उघडण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सतत कोणत्या ना कोणत्या डिजिटल उपकरणाचा वापर करत असतो. अलीकडच्या काळात, या उपकरणांचा अतिरेक होताना दिसून येतो. अगदी आबालवृद्धांपासून सगळेजण सतत कोणत्या ना कोणत्या डिजिटल उपकरणाचा वापर करत असतात आणि प्रत्येकाच्या घरात याचे किमान एक तरी उदाहरण हमखास आढळते.
माणसाला डिजिटल उपकरणांमुळे होणाऱ्या गंभीर समस्यांची तीव्रता अद्याप पूर्णपणे समजलेली नाही, आणि यामुळे या उपकरणांचा अतिरेक आपल्यावर हळूहळू गंभीर परिणाम करत आहे.
माहितीची सहज उपलब्धता, संवादाचे नवे मार्ग आणि करमणुकीचे असंख्य पर्याय ही डिजिटल युगाची सकारात्मक बाजू असली, तरी त्याचा अतिरेक आपले मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्य बिघडवू शकतो. म्हणूनच आपलं मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्य सांभाळायचं असेल, तर वेळोवेळी डिजिटल डिटॉक्स करणं गरजेचं ठरतं. यामुळेच “डिजिटल डिटॉक्स” ही संकल्पना उदयास आली आहे.
डिजिटल उपकरणांचा मेंदूवर होणारा परिणाम
आपल्या मेंदूत “डोपामिन” नावाचं एक रसायन असतं. जे आनंद आणि प्रेरणा निर्माण करतं. सोशल मिडिया, नोटिफिकेशन्स किंवा गेम खेळल्यावर डोपामिनचं स्रवण वाढतं. हे तात्पुरता आनंद देतं, पण सतत या प्रकारचं उत्तेजन मिळालं की मेंदूची नैसर्गिक डोपामिन प्रक्रिया बिघडते. हे उत्तेजन मेंदूच्या नैसर्गिक संतुलनाला बाधा पोचवतं, त्यामुळे साध्या गोष्टींमध्ये रस वाटेनासा होतो, एकाग्रता कमी होते आणि चिडचिड, मानसिक थकवा वाढतो. यालाच ‘डिजिटल अ‍ॅडिक्शन’ किंवा ‘डोपामिन डिसबॅलन्स’ म्हणतात. अशा वेळी डिजिटल उपकरणांपासून काही काळ दूर राहणं म्हणजेच डिजिटल डिटॉक्स. मेंदूला विश्रांती देण्यास आणि डोपामिनचं संतुलन पुन्हा मिळवण्यासाठी जे फारच उपयुक्त ठरतं.
डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय?
डिजिटल डिटॉक्स म्हणजे ठराविक काळासाठी डिजिटल उपकरणांपासून दूर राहणे. यामध्ये मोबाइल, टीव्ही, संगणक, सोशल मीडिया यांचा वापर टाळून प्रत्यक्ष जीवनातील अनुभवांना प्राधान्य देणे अपेक्षित असते.
डिजिटल डिटॉक्सचे फायदे:
मानसिक शांती – सतत मिळणारे नोटिफिकेशन्स बंद झाल्यावर मनाला विश्रांती मिळते. तणाव कमी होतो.
नातेसंबंध कुटुंबीयांशी अधिक वेळ घालवता येतो.
उत्पादकता वाढते- लक्ष विचलित होण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे कामात एकाग्रता वाढते. स्वतःच्या भावना, विचार यांचा शोध घेता येतो.
डिजिटल डिटॉक्स कसे करावे ?
एका दिवसात, आठवड्यातून एक वेळ किंवा सुट्टीच्या दिवशी डिजिटल उपकरणांपासून काही तासांचा विराम घ्या.
तुमच्या स्क्रीन टाईम वर लक्ष ठेवा आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे लक्ष्य ठरवा.
स्मार्टफोनवर असलेल्या नोटिफिकेशन्स बंद करा, जेणेकरून तुम्ही सतत विचलित होणार नाही.
बाहेर जाऊन निसर्गाचा आनंद घ्या, किंवा कोणत्याही शारीरिक क्रियेत भाग घ्या.
दिवसात ठराविक वेळासाठी मोबाईल वापर बंद ठेवावा.
झोपण्यापूर्वी एक तास मोबाइल दूर ठेवावा.
एक दिवस ‘नो सोशल मीडिया डे’ म्हणून पाळावा .
कुटुंबासोबत वेळ घालवावा, वाचन, ध्यानधारणा याकडे वळावे. लहान मुलांना लहानपणापासूनच स्क्रीनच्या आहारी जाण्यापासून रोखणं आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव, खेळ आणि संवाद यांच्याकडे वळवणं हे आजच्या पालकांसमोरचं मोठं आव्हान आहे
लहान मुलांसाठी डिजिटल डिटॉक्स
मुलांना लहानपणापासूनच डिजिटल सवयींपासून जपणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष खेळ, पुस्तकं, गोष्टी ऐकणं, नैसर्गिक वातावरणात वेळ घालवणं अशा गोष्टींमधून त्यांचा सर्वांगीण विकास होतो. पालकांनी लहान मुलांसाठी दिवसात ‘नो स्क्रीन टाइम’ निश्चित करावा आणि डिजिटल डिटॉक्सचा एक आरोग्यदायी नियम म्हणून अंगीकारावा.
डिजिटल तणावावर मात करण्यासाठी ध्यानधारणा, दीर्घ श्वसन आणि माइंडफुल मेडिटेशन हे अत्यंत प्रभावी उपाय आहेत. हे तंत्र मन शांत ठेवण्यास, तणाव कमी करण्यास आणि डोपामिनचं संतुलन राखण्यास मदत करतात. त्यामुळे डिजिटल उपकरणांचा वापर मर्यादित ठेवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी या सरावांचा दैनंदिन जीवनात समावेश करणे आवश्यक आहे .
डिजिटल तंत्रज्ञान हे जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये सुलभता आणते, पण त्याच्या अतिरेकाने आपल्याला आरोग्य आणि मानसिक शांततेचा मोठा धक्का बसू शकतो. म्हणूनच, योग्य प्रमाणात आणि जबाबदारीने त्याचा वापर करणे यातच आपले भले आहे.
मन आणि शरीर यांचा एक गहिरे आणि अपरिहार्य संबंध आहे. जर आपण आपल्या मनाची योग्य काळजी घेतली, तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर देखील होतो. शांती, तणावमुक्तता आणि सकारात्मक विचार हेच शरीराला निरोगी ठेवण्याचे गुपित आहे. म्हणूनच डिजिटल डिटॉक्स ही काळाची गरज ठरली आहे.
( लेखक मानसशास्त्राचे तसेच ताणतणाव व व्यवस्थापन याचे अभ्यासक आहेत)
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *