अनंत अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाच्या पदी नियुक्ती

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्योजक मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही जबाबदारी १ मे २०२५ पासून पुढील पाच वर्षांसाठी असेल. अनंत अंबानी याआधी रिलायन्स ग्रुपच्या अनेक कंपन्यांमध्ये गैर-कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. आता ते कार्यकारी नेतृत्वाचा भाग होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
मुकेश अंबानी यांनी २०२२ मध्येच त्यांच्या तीन मुलांमध्ये कंपनीच्या विविध व्यवसायांची जबाबदारी विभागली होती. ईशा अंबानी यांना रिटेल क्षेत्राची जबाबदारी, आकाश अंबानी यांना टेलिकॉम क्षेत्राची जबाबदारी, तर अनंत अंबानी यांना ऊर्जा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली होती.
अनंत अंबानी यांनी अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. ते रिलायन्स ग्रुपच्या जिओ प्लॅटफॉर्म्स, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स, रिलायन्स न्यू एनर्जी आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी या कंपन्यांच्या बोर्डाशी संबंधित आहेत. तसेच, ते रिलायन्स फाउंडेशनचे बोर्ड सदस्य देखील आहेत.
अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम जगजाहीर आहे. ते वन्यजीव पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र “वनतारा” चे संस्थापक आहेत. ही नियुक्ती रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दीर्घकालीन उत्तराधिकार योजनेचा भाग आहे.