माळशेज घाटात उभारला जाणार स्कायवॉक

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माळशेज घाट पावसाळ्यातील निसर्गसौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथे उंच पर्वत, हिरवीगार झाडे, धबधबे आणि ढगांनी वेढलेला परिसर पाहायला मिळतो. या भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेज घाटातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाच्या शेजारील टेकडीवर रिकाम्या जागेत काचेचा स्कायवॉक उभारण्यात यावा. सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्वावर या स्कायवॉकची उभारणी करण्यासाठी एक महिन्यात एकत्रित प्रस्ताव सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. माळशेज घाटामध्ये काचेचा स्कायवॉक बांधण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
माळशेज घाटात पिंपळगाव जोगा धरण, हरिश्चंद्रगड किल्ला, आणि कोकण कडा ही ठिकाणे भेट देण्यासारखी आहेत. पावसाळ्यात येथे येणारे धबधबे आणि सायबेरियातून स्थलांतरित होणारे फ्लेमिंगो पक्षी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते.
स्कायवॉक झाल्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील आणि पर्यटनाला चालना मिळेल. या भागाच्या विकासासाठी पर्यटन विभागाने एकत्रित प्रस्ताव सादर करावा. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग (राष्ट्रीय महामार्ग) यांनी या प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करावा,असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.