पहलगाम हल्ल्यातील पिडितांच्या चौकशीसाठी IB आणि NIA टिम डोंबिवलीत दाखल

डोंबिवली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली येथील रहिवासी अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले यांचा हकनाक बळी गेला. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत झालेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. कुटुंबियांनी दहशतवाद्यांना अगदी जवळून पाहिले असल्याने तपासात मदत व्हावी यासाठी आता IB आणि NIA त्यांची चौकशी करणार आहे. यासाठी दोन्हीची पथके डोंबिवलीत दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. ही टीम डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे डोंबिवली येथील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले कुटुंबियांसोबत गेले होते. पहलगाममध्ये ते असताना दहशतवादी घुसले. त्यांनी हिंदू कोण आहे? असे विचारत गोळ्या झाडल्या. त्यात अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले या तिघांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी दहशतवाद्यांना अगदी जवळून पाहिले आहे.
संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यांच्या हाताला गोळी लागून गेली होती. त्यांनी दोन दहशतवाद्यांना पाहिल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यातून दहशतवाद्यांसंदर्भात माहिती मिळू शकते, यामुळे एनआयएचे पथक चौकशी करण्यासाठी डोंबिवलीत दाखल झाले आहे.
दरम्यान फरार दहशतवाद्यांचा पत्ता सांगणाऱ्यांना २० लाख रुपयांचे बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले आहे. हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फोटो आणि रेखाचित्रे तपास संस्थांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आदिल हुसेन ठोकर (रा. अनंतनाग), हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तल्हा भाई अशी या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.
SL/Ml/SL
24 April 2025