मुंबईतील सात पोलीस ठाण्यांना आयएसओ प्रमाणपत्र

 मुंबईतील सात पोलीस ठाण्यांना आयएसओ प्रमाणपत्र

मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क):
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या १०० दिवस कृती आराखड्यानुसार राबविण्यात येणाऱ्या “क्षेत्रीय कार्यालय सुधारणा” विशेष मोहिमेच्या अनुषंगाने मुंबईतील परिमंडळ १२ अंतर्गत येणाऱ्या सातही पोलीस ठाण्यांनी उल्लेखनीय प्रगती साधत ISO 9001:2015 हे प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

या मोहिमेअंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये कार्यालयीन स्वच्छता, नागरिकांसाठी सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, तक्रारींचे निवारण, कालबाह्य अभिलेखांचे निर्लेखन तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन कायदे आणि तंत्रज्ञान यांचे प्रशिक्षण अशा विविध घटकांचा समावेश करण्यात आला. यामुळे नागरिकांसाठी पोलीस सेवा अधिक परिणामकारक व सुलभ बनली आहे.

वनराई, आरे, दिंडोशी, कुरार, समता नगर, कस्तुरबा मार्ग आणि दहिसर या सातही पोलीस ठाण्यांनी गुणवत्तेच्या सर्व निकषांची पूर्तता करत कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ केली. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अब्युल्युट कन्सल्टंटस या संस्थेने तीन टप्प्यांत सखोल पाहणी करून संबंधित पोलीस ठाण्यांना आयएसओ प्रमाणपत्र बहाल केले. पाहणी दरम्यान कार्यपद्धती, अभिलेख व्यवस्थापन, कार्यालयीन स्वच्छता, नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा अशा विविध बाबींचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.

या यशस्वी मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का. व सु.) सत्यनारायण चौधरी आणि अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग अभिषेक त्रिमुखे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, परिमंडळ १२ चे पोलीस उप आयुक्त श्रीमती स्मिता पाटील, सर्व विभागीय सहायक पोलीस आयुक्त तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सक्रिय सहभाग घेत प्रभावी अंमलबजावणी केली.

ही कामगिरी संपूर्ण मुंबई पोलीस दलासाठी आदर्श ठरत असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा व जनसेवाप्रती असलेल्या बांधिलकीचा उत्कृष्ट नमुना म्हणून अधोरेखित होत आहे.

SW/ML/SL

10 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *