सुनिता विल्यम्स यांचे आयुष्य पूर्वपदावर येण्यासाठी लागणार मोठा कालावधी

फ्लोरिडा, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स तब्बल ९ महिन्यांच्या आंतरराष्ट्रीय स्थानकातील वास्तव्यानंतर आज पहाटे आपल्या सहकाऱ्यांसह पृथ्वीवर सुखरुप परतल्या आहेत. सुनिता यांच्या या आगमनाबद्दल त्यांचे जगभरातून स्वागत आणि कौतुक होत आहे. मात्र मोठा काळ अंतराळात वास्तव्य केल्यामुळे सुनिता विल्यम्स यांचे आयुष्य पूर्वपदावर येण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. अंतराळ स्थानकात शून्य गुरुत्वाकर्षणात राहील्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम झाला असून त्यांना साधं चालू फिरु लागण्यासही काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
संपूर्णपणे वेगळ्या वातावरणात राहिल्यामुळे त्यांच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्यांना ४५ दिवसांच्या ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’मध्ये राहावं लागणार आहे!
सुनीता विल्यम्स व बुच विलमोर हे पृथ्वीवर जरी परतले असले, तरी त्यांना लगेच पूर्वीसारखं सामान्य आयुष्य जगता येणार नाही. त्यासाठी त्या दोघांनाही किमान ४५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. इतक्या मोठ्या काळासाठी पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वास्तव्य केल्यामुळे या दोन्ही अंतराळवीरांच्या शरीरात झालेले बदल, त्यांच्या शरीराची झालेली झीज किंवा त्यांच्या शरीरानं अंतराळ स्थानकातील वातावरणाशी जुळवून घेतल्याने बदललेल्या गोष्टी या सर्व बाबी पूर्वपदावर येण्यासाठी हा काळ त्यांनी नियोजित उपचार घेणं आवश्यक असेल.
पहिल्या टप्प्यात सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांना चालणे-फिरणे, शारिरीक लवचिकता आणि स्नायू बळकट करणे यासंदर्भात उपचार दिले जातील.
दुसऱ्या टप्प्यात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची जाणीव, त्यानुसार शारिरीक क्रियांमध्ये आवश्यक ते बदल, शरीराची जाणीव, आसपासच्या परिस्थितीची जाणीव यांचा समावेश होतो.
तिसरा टप्पा हा या कार्यक्रमाचा सर्वात अधिक काळ चालणारा टप्पा असेल. या टप्प्यात सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांच्या शारिरीक कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल.
SL/ML/SL
19 March 2025