सैफ अली खानच्या पाठीतून काढला ६.३५ सेंटीमीटरचा चाकूचा तुकडा

अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरात एका अज्ञात व्यक्तीकडून चोरीचा प्रयत्न झाला. त्याच्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात सैफवर चोराने चाकूने वार केले. त्याच्या पाठीवर आणि हातावर जखमा झाल्यात. आता अभिनेता सैफ अली खानच्या पाठीतून डाॅक्टरांना 6.35 सेंटीमीटरचा चाकूचा तुकडा मिळाला आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा त्याच्या शरीरातून काढला आहे. सैफ अली खानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, तो हल्ल्यात थोडक्यात बचावला. चाकू त्याच्या मणक्यापासून फक्त दोन मिलीमीटर दूर होता. सैफ आता बरा असून काळजी करण्याचे कारण नाही, असं डॉक्टरांनी नमूद केलं. दरम्यान, पोलिसांनी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.