सिंगापूरमध्ये उद्यापासून ९ व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

सिंगापूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे नववे ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ १४ ते १८ जानेवारी २०२५ दरम्यान पार पडणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखिका आणि ज्येष्ठ समाजसेविका रजिया सुलताना (अमरावती) यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार मनोज भोयर हे या संमेलनाचे उदघाटक असणार आहेत. ‘शब्द परिवार’ तर्फे दरवर्षी परदेशात मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी मॉरिशस, मलेशिया, बँकॉक, इंडोनेशिया, दुबई, श्रीलंका, मालदीव, नेपाळ आदी देशांत विश्व मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती या संमेलनाचे आयोजक आणि ‘शब्द परिवारा’चे अध्यक्ष संजय सिंगलवार यांनी दिली आहे.
सिंगापूर येथे या साहित्य संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन, प्राध्यापकांच्या शोध निबंधांचे सादरीकरण होणार आहे. कवी संमेलनात मान्यवर कवी, कवयित्री सहभागी होणार आहे.
संमेलनात लेखिका रजिया सुलताना यांची मुलाखत ज्येष्ठ कवयित्री शशी डंभारे घेणार आहे. ‘सिंगापूर देशाची जडणघडण’ या विषयावर सतीश बोरुलकर (मुंबई) यांचे व्याख्यान, ‘पुढच्या पिढीच्या दृष्टीने भारत आणि सिंगापूर’ या विषयावर सुहानी राणा (दिल्ली), साक्षी डंभारे (मुंबई) आणि अंजली खोडदे (अहमदनगर) यांच्यादरम्यान संवाद आयोजित करण्यात आला आहे.
‘चपराक’ मासिकाच्या पत्रकार चंद्रलेखा बेलसरे (पुणे) यांचा ‘ओव्हरटेक’ हा गुढकथा संग्रह, डॉ. अनिल गजभिये (इंदूर) यांचा ‘अस्मितादर्शी समीक्षा’ हा ग्रंथ, संमेलनाध्यक्ष रजिया सुलताना यांच्या ‘गौतम बुद्धांच्या बोधकथा’, अर्चना शंभरकर -गाडेकर (उपसंचालक, माहित व जनसंपर्क विभाग) यांच्या ‘सरिनास -स्टोरी बोर्ड’ आदी पुस्तकांचे प्रकाशन या संमेलनात होणार असल्याची माहिती सिंगलवार यांनी दिली. संमेलनात सहभागी साहित्यिक आणि रसिकांसाठी सिंगापूर शहराची सफर आयोजित करण्यात आली आहे.
SL/ML/SL
13 Jan. 2025