ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटक जिप्सींना नवीन नियम

चंद्रपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटक जिप्सींना रिव्हर्स घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर सफारी दरम्यान यु टर्न मारण्यासाठी देखील प्रतिबंध घालण्यात आला आहे. टी 114 वाघिणीला घेराव करून डझनभर जिप्सी कोर भागात पर्यटन करत असल्याचे फोटो नुकतेच वायरल झाले होते. त्यानंतर ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने कठोर निर्णय घेत 10 जिप्सी -गाईड आणि चालक यांना पर्यटन साखळीतून निलंबित केले आहे.
त्यानंतर संबंधित घटकांची बैठक घेत प्रशासनाने हा नवा नियम लागू केलाय. दरम्यान गेल्या वर्षभराच्या काळात ज्या- ज्या पर्यटक जिप्सी तथा गाईड यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे अशा विविध 15 प्रकरणांमध्ये वेगळी स्वतंत्र कारवाई करत या 15 जिप्सी तसेच गाईड यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. यामुळे 48 तासात एकूण कारवाईची संख्या 25 वर पोचली आहे. ताडोबात वाघ बघण्यासाठी पर्यटक, जिप्सी चालक , गाईड यांच्यावर आणत असलेला दबाव लक्षात घेता त्यांना शिस्त लावण्यासाठी हा धडक निर्णय घेण्यात आला आहे.
ML/ML/PGB 30 May 2024