अमेरिकेतील या राज्यात बर्ड फ्लूची लागण

 अमेरिकेतील या राज्यात बर्ड फ्लूची लागण

टेक्सास, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेतील टेक्सास राज्यात दुधाळ जनावरांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना बर्ड फ्लू रोगाची लागण झाल्याचे तेथील राज्याच्या आरोग्य खात्याने जाहीर केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पक्ष्यांना होणारा हा साथीचा रोग कोविड रोगापेक्षा शंभर पटीने भयंकर ठरू शकतो, त्यामुळे दक्षता घेणे गरजेचे आहे असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.

एच फाइव्ह एन वन (H5N1) अर्थात बर्ड फ्लू या पक्ष्यांना होणाऱ्या विषाणूजन्य रोगाचे अमेरिकेतील बहुतेक प्रत्येक राज्यातील व्यावसायिक व परसबागेतील पोल्ट्री उद्योगात २०२० नंतर मोठ्या प्रमाणात संक्रमण झाले आहे. त्याचे कारण म्हणजे या रोगाला कारणीभूत विषाणूचा नवा प्रकार (स्ट्रेन) विकसित झाला आहे.

अमेरिकेतील रोग नियंत्रण व प्रतिबंध विभागानेही वेळीच धोका ओळखून तातडीचे सर्व उपाय करण्यास सुरुवात केली आहे. अर्थात बर्ड फ्लू रोगाशी संबंधित उद्योगांव्यतिरिक्त सार्वजनिक स्तरावरील नागरिकांना मात्र त्याया रोगाचा धोका नसल्याचेही या विभागाने स्पष्ट केले आहे. हा रोग मानवामध्ये संक्रमित होईल असे कोणते बदलही सध्या आढळले नसल्याचेही अमेरिकी कृषी विभागाने म्हटले आहे.

पिट्सबर्ग येथील बर्ड फ्लू रोगाचे संशोधक सुरेश कुचिपुडी यांच्या म्हणण्यानुसार साथीचा प्रमुख रोग म्हणून बर्ड फ्लूचे नाव अनेक वर्षांपासून अग्रस्थानावर आहे. जगभरात आढळलेल्या घटनांवरून हा रोग केवळ पक्ष्यांपुरता मर्यादित नाही. तर जनावरे व माणसे यांच्यातही संक्रमण करण्याची त्याच्यात क्षमता आहे. त्यामुळे हा जगातील सर्वांत मोठा साथीच्या रोगाचा धोका आहे, असे कुचिपुडी यांनी म्हटले आहे

SL/ML/SL

7 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *