मुख्यमंत्री राज्यात गुंड पाळतात आणि भाजपा ही संपवतील

ठाणे, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात गुंड पोसले असून माझ्यासारख्या लोकांना ते गुन्हेगार बनवू इच्छित आहेत , भाजपा पक्ष ही संपविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हे सांगून झाले आहे असे सनसनाटी आरोप आज गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहेत.
शिंदे गटाचे कल्याणचे स्थानिक नेते असणाऱ्या महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यावर थेट पोलिस ठाण्यातच गोळीबार करून त्यांना जखमी करणाऱ्या आ गायकवाड यांना पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपात अटक केली आहे.
त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना आ गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभरात गुंड पोसले असून त्यांना ते संरक्षण देतात. शिंदे यांनी माझे हजारो कोटी रुपये हडप केले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे हे सातत्याने मला मतदारसंघात त्रास देतात , माझ्या कामांचे श्रेय लाटतात. आमच्या पक्षाच्या बैठकीत वारंवार मी याबाबत तक्रारी केल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा भाजपा समाविण्याचा प्रयत्न आहे म्हणून त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी आपली मागणी असल्याचे आ गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
आ गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात गेले अनेक महिने वैमनस्य असून त्यामुळे कल्याण पूर्व येथे सातत्याने भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात संघर्षाच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र दोन्ही बाजूने त्यावर गांभीर्याने दखल घेतली गेली नाही असे आजच्या घटनेवरून स्पष्टपणे दिसून आले आहे.
आजची घटना अत्यंत गंभीर असून त्याबाबत अधिक माहिती घेत आहोत असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महेश गायकवाड यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीर असून त्याबाबत पोलीस महासंचालक यांना लक्ष घालण्यास सांगितल्याचे माध्यमांकडे स्पष्ट केले. आरोपी कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे ही स्पष्ट केले आहे. आता आ गायकवाड यांची ही कृती भाजपाच्या प्रतिमेला थेट तडा देणारी असल्याने भाजपा त्यांच्या पाठीशी घालतो की त्यांच्यावर अन्य काही कारवाई करतो ते पाहावे लागेल.
ML/KA/PGB 3 Feb 2024