Bajaj चेतक स्कूटरचं सीएनजी व्हर्जन लवकरच होणार लाँच

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बजाज कंपनीची चेतक ही स्कूटर एकेकाळी सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय होती. ‘हमारा बजाज’ या टॅग लाईनने होणारी चेतकची जाहिरात आजही तुम्हाला आठवत असेल. हीच चेतक आता नव्या रुपात तुमच्या समोर येणार आहे. CNG वर चालणाकी स्कूटर लवकरच बाजारात दाखल होणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढत असताना लोक सातत्याने त्यासाठी पर्याय शोधत आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकचा पर्याय उपलब्ध आहे, मात्र रेंज आणि बॅटरीची किंमत यामुळे बरेच लोक त्याकडेही पाठ फिरवतात. अशातच बजाजने या दोन्ही समस्यांवर उपाय उपलब्ध केला आहे. लवकरच बजाजच्या चेतक स्कूटरचं सीएनजी व्हर्जन लाँच होणार आहे. मीडिया रिपोर्ट्स ही माहिती समोर आली आहे. 2024 किंवा 2025 साली ही स्कूटर मार्केटमध्ये लाँच केली जाऊ शकते. अर्थात, बजाजने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
बजाजच्या या स्कूटरबाबत राजीव बजाज यांनी 2008 सालीच भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते, की कंपनी अशा एका स्कूटरवर काम करत आहे, ज्यामध्ये ड्युअल इंजिन व्हेरियंट उपलब्ध केले जाईल. अखेर आता इतक्या वर्षांनंतर चेतक CNG बाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. काळानुरूप आपल्या चेतक या स्कूटरमध्ये बजाजने मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. इलेक्ट्रिकचा जमाना सुरू झाल्यानंतर कंपनीने चेतक इलेक्ट्रिक देखील लाँच केली होती. आता कंपनी सीएनजी व्हेरियंटवर काम करत आहे. हे मॉडेल अगदी डिजिटल आणि मॉडर्न असणार आहे.
SL/KA/SL
3 Feb. 2024