ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वात सात दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (८८) यांचं आज निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. जयंत सावरकर हे गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात वास्तव्य करत होते. जयंत सावरकर यांच्या पार्थिवावर उद्या (२५ जुलै) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मराठी सिनेविश्व, नाट्यविश्व आणि मालिका विश्वावर जयंत सावरकर यांच्या निधनाच्या बातमीने शोककळा पसरली आहे.
जयंत सावरकर यांचा जन्म १९३६ मध्ये गुहागर जि. रत्नागिरी येथे झाला. त्यांचा मोठा भाऊ मुंबईत नोकरी करत होता. त्याच्याकडे जयंत सावरकर आले आणि गिरगावातच त्यांचं वास्तव्य दीर्घकाळ होतं. आपल्या कारकिर्दीची सुरुवातीची बारा वर्षे त्यांनी बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणूनही काम केलं. त्याचवेळी ते नोकरीही करत होते. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक आणि कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम केलं. हौशी नाट्य संस्थांमधून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.
गेल्या सात दशकांहून अधिकाकाळ त्यांनी १०० पेक्षा जास्त नाटकांमध्ये, तर हिंदी आणि मराठी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे. त्यांच्यामागे त्यांचा मुलगा कौस्तुभ आणि मुलगी सुवर्णा तसंच सुषमा असं कुटुंब आहे. जयंत सावरकर यांनी अनंत दामले, केशवराव दाते, जयराम शिलेदार, दादा साळवी, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, परशुराम सामंत, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, रामदास कामत, राजा परांजपे, सुरेश हळदणकर यांच्यासह अद्वैत दादरकर, मंगेश कदम, चंद्रकांत कुलकर्णी, समीर विद्वांस या आणि अशा अनेक जुन्या नव्या पिढीतील दिग्दर्शकांसह काम केलं आहे. जयंत सावरकर यांनी तीसपेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्येही कामं केली आहेत. ९७ व्या नाट्य परिषदेचं अध्यक्षपदही जयंत सावरकर यांनी भूषवलं आहे.
अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे),अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष),अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), एकच प्याला (तळीराम) सारख्या मराठी नाटकात त्यांनी काम केलं. त्यांच्या या भूमिका मराठी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहिल्या. त्या वेगवेगळ्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतूक केले. अगदी अलिकडच्या काळापर्यंत ते अभिनय करत होते. आई कुठे काय करते, तुमची मुलगी काय करते या मालिका, समांतर ही वेबसिरिज यामध्येही त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या.
SL/KA/SL
24 July 2023