पंचगंगा इशारा पातळीकडे:69 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात पावसाचं धुमशान सुरूच आहे. पात्रा बाहेर पडलेली पंचगंगा आता इशारा पातळीकडे वाटचाल करीत आहे. गेल्या 24 तासात पंचगंगेची पातळी सहा फुटांनी वाढली आहे. आज सकाळी नऊ वाजेपर्यंत ती 35 फुटांवर पोहोचली होती. इशारा पातळी 39 फुटांवर आहे.जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सुमारे 200 हून अधिक गावांचा एकमेकांशी असणारा थेट संपर्क तुटला असून पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू आहे.पाणी पातळी वेगानं वाढत असल्यानं पूरबाधित परिसरातील लोकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात भूस्खलनाचा धोका असणाऱ्या 88 गावात आत्ता जिल्हा प्रशासनाच्या प्रशासनाची पथक कार्यरत राहणार आहेत मोठा पाऊस असेल त्यावेळी दररोज सकाळी आणि संध्याकाळी या पत्रकाकडून परिसराची पाहणी केली जाणार असून भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना दक्षतेच्या सूचनाही जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिले आहेत.सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील 15 पैकी तेरा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. त्यामुळे राधानगरी धरणातून एक हजार दोनशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.भोगावती, कासारी हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा, कुंभी, वारणा, कडवी,धामणी, तुळशी नदीतील पाणी पात्रा बाहेर पडलं आहे.सर्वच नद्यांना पूर आला आहे. परिणामी सर्वच नद्यांतील 69 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.बर्की धबधबा आणि बर्की गावाला जाणारा पूल मुसळधार पावसाच्या जोरामुळे पाण्याखाली गेला आहे, म्हणून बर्की ला कोणी जाऊ नये , असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. गगनबावडा तालुक्यातील कोदे, चंदगड मधील जांबरे आणि घटप्रभा ही तीन धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत.राधानगरी धरण 62% तुळशी 63 टक्के वारणा 55% दूधगंगा 29 टक्के असा प्रमुख धरणातील पाणीसाठा झाला आहे.गगनबावडा आणि शाहूवाडी तालुक्यात अतिवृष्टी झाली. गगन बावडा तालुक्यात 104.7 मिलिमीटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. आज आणि उद्या कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार तर रविवारी, सोमवारी जोरदार पाऊस राहील,असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
ML/KA/PGB 21 July 2023