पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे शिबिर

ठाणे, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी ऑपरेशन मुळे भाजपतील अनेकांच्या मंत्रिपदाच्या इच्छेला सुरुंग लागला आहे, त्यामुळे केवळ शिंदे गटातच नाही तर भाजपा आमदारांमध्ये ही मोठी नाराजी आहे, ती अद्याप जाहीर व्यक्त झालेली नसली तरी ती दूर करण्यासाठी आज पक्षाने प्रयत्न केले आहेत.
ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे एक राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर घेऊन त्यात वरिष्ठ नेत्यांनी झालेल्या राजकीय घडामोडींची आवश्यकता पटवून देण्याचा प्रयत्न आमदार , खासदार आणि पदाधिकाऱ्यांना केला. आगामी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपचे विधानसभेत १५२ आमदार तर लोकसभेत ४५ हुन अधिक खासदार निवडून येतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केला आहे.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी हे शिबिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकून पुन्हा सत्ता मिळवणे हेच उद्दिष्ट सध्या पक्षासमोर आहे हे स्पष्ट आहे.यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना बावनकुळे म्हणाले ,
भाजपच्या वाट्याला विधानसभेच्या जेवढ्या जागा येथील त्यातीलही ८० टक्क्यांहून अधिक जागा भाजपा जिंकेल.
भिवंडीत आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात भाजपच्या ५६० पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यानंतर विभागवार प्रशिक्षण सुरूच राहणार असून सुमारे १ लाख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महायुतीच्या कार्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळातील विकास कामांची माहिती घरोघरी पोहविण्यात येणार असून यासाठी २८८ पूर्ण वेळ विस्तारक काम करणार असून या सर्व कामांचे भाजपा सूक्ष्म ऑडिट करणार आहे.
या सर्व नियोजनाच्या माध्यमातून भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीच्या विधानसभेत २०० हून अधिक तर लोकसभेत ४५ हून अधिक जागा निवडून आणण्यासाठी योजना आज या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली आहे अशी माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली.या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न असून या माध्यमातून भाजप संसदेपासून ते पंचायत पर्यंत नंबर एकचा पक्ष राहील असे मत देखील बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केले.
राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पत्रकारांनी विचारले असता याबाबतचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते घेतील अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी यावेळी दिली असून राज्यात सत्तेत असलेल्या भाजप शिवसेना तसेच राष्ट्रवादी या तीनही पक्षांमध्ये चांगला समन्वय असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
तीनही पक्षांचे चार चार चार अशा बारा जणांची समन्वय समिती प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली गठीत करण्यात आली असल्याचेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
या प्रशिक्षण शिबिरात केंद्रीय पंचायतीराज राज्य मंत्री कपिल पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे,डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार यांच्यासह राज्यातील मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण,डॉ.सुरेश खाडे,मंगलप्रभात लोढा,माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासह भाजपचे राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ML/KA/SL
13 July 2023