या माजी मुख्यमंत्र्यांची कन्या करणार लिंगबदल शस्त्रक्रिया

कोलकाता, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची कन्या सुचेतना भट्टाचार्य हीने लिंग परिवर्तन करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. तिच्यावर सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी होणार आहे. शस्त्रक्रियेनंतर तिला सुचेतन या नावाने ओळखले जाईल असे तिने एका भाषणा दरम्यान स्पष्ट केले आहे. ४१ वर्षीय सुचेतना या पर्यावरणशास्त्रज्ञ आहेत. तसेच एक ट्रान्सजेंडर कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ताही आहेत. 2015 पासून त्या कोलकाता रेनबो प्राइड फाउंडेशनच्या संचालक मंडळाच्या सदस्या आहेत.
ट्रान्समॅन होण्याच्या निर्णयाबद्दल माहिती देताना सुचेतना म्हणाल्या, “शालेय जीवनापासून मी स्वतःला पुरुष म्हणून ओळखले. ही भावना कालांतराने आणखी विकसित होत गेली.आता मला शारीरिकदृष्ट्याही पुरुष व्हायचे आहे. मानसिकदृष्ट्याही मी पुरुष आहे.मी सर्व राजकीय पक्षांना LGBTQIA+ समुदायाला पाठिंबा देण्याची विनंती करू इच्छिते, तरच समाज हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेईल आणि त्यांना त्रास देणे थांबवेल. दुसरे म्हणजे, LGBTQIA+ समुदायाला पाठिंबा देण्यासाठी मीडियाने पुढे यावे.”
अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या उषाशी चक्रवर्ती म्हणाल्या की, सुचेतना यांच्यासारख्या व्यक्तीसाठी ज्यांचे वडील राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, अशा व्यक्तीसाठी इतके धाडस दाखवून असा निर्णय जाहीर करणे सोपे नाही. मला वाटते की सुचेतना यांचे धाडसी पाऊल इतर अनेकांना निराशेतून बाहेर येण्यास आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्यास प्रोत्साहित करेल.
SL/KA/SL
21 June 2023