तंतुवाद्यांना आता मिळाला मयुरपंखी साज….

 तंतुवाद्यांना आता मिळाला मयुरपंखी साज….

सांगली, दि १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्ह्यातील मिरजेतील तंतूवाद्य व्यवसायाने आता कात टाकली असून, येथील युवा तंतूवाद्य कारागिरांनी तंतुवाद्य निर्मितीत नवनवे प्रयोग केले आहेत. पूर्वी पारंपारिक रंगात उपलब्ध असणारी तंतूवाद्ये आता आकर्षक अशा विविध रंगात उपलब्ध होऊ लागली आहेत.

सतारी, तंबोरे यांना रंगीबेरंगी मेटॅलिक रंग देण्यात येऊ लागले आहेत. नईम सतारमेकर यांनी नुकतीच मयुरपंखी रंगातील आकर्षक सतार बनविली आहे. प्रसिध्द चित्रकार उगारे बंधूंनी त्यावर कलात्मक रंगकाम केले आहे. मिरजेत तयार होणाऱ्या या विविध रंगातील या सतारी आणि तंबोऱ्यांना देश-परदेशातील कलाकारांकडून पसंती मिळत आहे.

युवा कारागीर नईम सतारमेकर यांनी एका कलाकाराच्या मागणीनुसार मयूरपंखी रंगातील आकर्षक सतार बनवून दिली आहे. अक्षरश: पिसारा फुललेला मोरच या सतारीवर अवतरला आहे. मिरजेतील प्रसिध्द चित्रकार महमदसिराज उगारे, उस्मान उगारे, मुज्जमिल उगारे यांनी या सतारीवर सुबक असे रंगकाम केले आहे. मिरजेत तयार होणारी ही तंतूवाद्ये आवाजाच्या बाबतीत दर्जेदार तर आहेतच, शिवाय आकर्षक अशा रंगात मिळत असल्याने कलाकारांकडून परदेशातून मागणी आहे.

मिरज शहर हे दीडशे वर्षांहून अधिक काळ तंतूवाद्य निर्मितीसाठी प्रसिध्द आहे. दीडशे वर्षांपूर्वी फरीदसाहेब सतारमेकर यांनी लावलेल्या तंतूवाद्य निर्मितीच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. युवा कारागीर आता तंतूवाद्य निर्मितीत आधुनिक प्रयोग करीत आहेत. पारंपारीक वाद्य निर्मितीला नव्या प्रयोगांची जोड देत जुनी वाद्ये अधिक लोकप्रिय कशी होतील, याबाबत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयोगाचा एक भाग म्हणून तंतूवाद्यांना पारंपारीक रंग न देता ग्राहकांना आकर्षित करतील, असे रंग आता देण्यात येऊ लागले आहेत.

मिरजेतील तंतूवाद्य निर्मितीच्या प्रारंभीच्या काळात पानाचा विडा कुटून त्यात थोडे पाणी मिसळून त्याचा लाल रंग तयार करुन तो तंतूवाद्यांना देण्यात येत असे. नंतरच्या काळात लाखेच्या रंगाचा वापर करण्यात येऊ लागला. पत्रीलाख पातळ करुन त्यात स्पिरीट मिसळून पिवळा, तपकीरी, यांसारखे रंग देण्यात येऊ लागले. हे रंग देण्यात काही विशिष्ठ कारागिरांनी हातखंडा मिळविला होता. आता मात्र, हीच तंतूवाद्ये नव्या, आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होत आहेत. त्यासाठी मेटॅलिक रंगांचा वापर होऊ लागला आहे. पूर्वीची हाताने रंग देण्याची पध्दत आता कमी झाली असून, स्प्रेद्वारे हे रंग तंतूवाद्यांना देण्यात येतात.

ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना हव्या त्या रंगातील सतार आणि तंबोरे तयार करण्यात येत आहेत. ही तंतूवाद्ये आवाजाच्या बाबतीत दर्जेदार तर आहेतच, शिवाय आकर्षक अशा रंगात मिळत असल्याने ग्राहकांची पसंती त्याला मिळत आहे.

ML/KA/SL

16 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *