दान पत्रासाठी आता पाचशे रुपये मुद्रांक शुल्क, अपील शुल्क हजार रुपये
मुंबई दि २५ : महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील विविध प्रकारच्या नोंदणीसाठी आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात एकरुपता व सुसंगती आणण्याकरिता महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम ३२ (ब) आणि ५३ (१अ) आणि कलम ५२ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील अनुच्छेद ३४ मध्ये निवासी किंवा कृषि मालमत्ता, पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात किंवा मयत मुलाची पत्नी यांना दान केल्यास दानपत्रासाठी आता २०० रुपयाऐवजी पाचशे रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच कलम ३२ (ब) आणि कलम ५३ (१अ) अंतर्गत अपिलासाठी यापूर्वी तीनशे रुपये शुल्क आकारण्यात येत होते. ते आता या दोन्ही प्रकारांसाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. याशिवाय कलम ५२ अंतर्ग मुद्रांक शुल्क परताव्यासाठी मुद्रांक खरेदी केल्यापासून सहा महिन्यांच्या आत अर्ज करावा लागत असे. आता ही मुदत मुद्रांकधारकांना पुरेसा कालावधी उपलब्ध व्हावा यासाठी सहा महिन्यांवरून एक वर्ष करण्यात येणार आहे. याबाबतचे विधेयक विधिमंडळात सादर करण्यास मंजुरी देण्यात आली.ML/ML/MS