१०० व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे

 १०० व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  डॉ. शरणकुमार लिंबाळे

पुणे,दि. २४ : जानेवारी २०२७ अखेरीस पुणे येथे होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आज ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या अध्यक्षपदावरून महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथील कार्यकारीणीत वाद असल्याची चर्चा रंगत होती. संमेलन जवळ आले असताना अध्यक्षपदाची जागा रिकामी असण्याकरून अनेक चर्चा सुरू होत्या. आज अखेर शरणकुमार लिंबाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने सारे वाद शमले आहेत.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत शरणकुमार लिंबाळे यांना अध्यक्षपदी नेमण्याचा निर्णय झाला.दुष्काळामुळे संमेलन साधेपणाने घ्यावे याबाबतही यावेळी चर्चा झाली.

शरणकुमार लिंबाळे यांची साहित्यिक कारकिर्द

‘अक्करमाशी’ या आत्मकथनाने डॉ. लिंबाळे यांना मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र ओळख मिळवून दिली. ‘द आऊटकास्ट : अक्करमाशी’ या नावाने त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला आणि या साहित्यकृतीचा विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सहभाग झाला आहे. ‘सनातन’, ‘उपल्या’, ‘हिंदू’, ‘रामराज्य’, ‘गावकुसाबाहेरील कथा’, ‘दलित पँथर’, ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ अशा विविध साहित्यकृतींमधून त्यांनी जात, अस्मिता, सामाजिक विषमता, इतिहास आणि माणसाच्या जगण्याचे प्रश्न मांडले आहेत.

लिंबाळे यांनी चाळीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून दिलीपराज प्रकाशनतर्फे त्यांचे ‘दलित फाईल्स’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. चाळीसच्यावर पुस्तकांचा साहित्यप्रवास असलेल्या डॉ. लिंबाळे यांच्या साहित्यकृतींचे हिंदी, इंग्रजीसह मल्याळम, तमिळ, कन्नड, पंजाबी, गुजराती आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद झालेत.

२०११ मध्ये १२व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि २०१९ मध्ये प्रा. रा. ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार त्यांना लाभला. तसेच ‘सनातन’ या कादंबरीसाठी २०२० सालचा के. के. बिर्ला फाऊंडेशनचा मिळालेला सरस्वती सन्मान हा त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा गौरव ठरला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *