प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचे १२८ एनसीसी कॅडेट्स ….
पुणे दि २३ : महाराष्ट्रातील एनसीसी कॅडेट्सचा दर्जा नेहमीच उच्च राहिला असून, महाराष्ट्र एनसीसी संचालनालय गेल्या अनेक वर्षांपासून चॅम्पियन संचालनालय ठरत आहे. यंदा विविध विभागांमधून आणि अनेक निवड शिबिरांमधून निवड झालेले राज्यातील १२८ कॅडेट्स प्रजासत्ताक दिन संचलनासाठी तयारी करत आहेत.
कॅडेट्सना उत्कृष्ट कामगिरी करता यावी यासाठी आवश्यक साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नृत्यदिग्दर्शन, विविध प्रॉप्स आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. राष्ट्रीय नेतृत्व आणि संचलन पाहण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांसमोर हे कॅडेट्स उत्कृष्ट सादरीकरण करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
एनसीसीच्या उपक्रमांचे कार्यक्षेत्र केवळ प्रजासत्ताक दिन संचलनापुरते मर्यादित नसून, तरुणांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण आणि नवे अनुभव देण्यावरही भर दिला जात आहे. मुंबई येथे एनसीसी कॅडेट्ससाठी स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला होता. यापूर्वी कॅडेट्सना नौदलाच्या जहाजांवर सागरी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच कोकणातील रत्नागिरी येथून सुरू झालेल्या ओपन सी सेलिंग मोहिमेत कॅडेट्सनी सुमारे २५० किलोमीटरचा सागरी प्रवास केला.
याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथे सायबर डिफेंडर प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून, त्याअंतर्गत तरुणांना सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांमध्ये शिस्त, साहस आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विविध क्षेत्रांचा अनुभव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे एनसीसी महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी यांनी सांगितले आहे.
ML/ML/MS