वांद्रे पश्चिम स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार

 वांद्रे पश्चिम स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार

मुंबई, दि १९: वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्त्यांची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महापालिका आता रस्ता रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणाचा मोठा प्रकल्प हाती घेणार आहे. या कामासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाला १ कोटी ८२ लाख ६ हजार रुपयांचा मोबदला देण्याचा प्रस्ताव शुक्रवार, ( २२ मे ) रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक हे पश्चिम उपनगरातील अत्यंत वर्दळीचे स्थानक मानले जाते. स्थानक परिसरातील रस्ते अरुंद असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिक आणि प्रवाशांमध्ये नाराजी होती.
या पार्श्वभूमीवर एच/पश्चिम विभागाने स्थानकाबाहेरील अनधिकृत बांधकामे आणि दुकाने हटवून काही प्रमाणात रस्ते मोकळे केले आहेत. मात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानकालगतची रेल्वे प्रशासनाची जागा ताब्यात घेणे आवश्यक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते.
रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियोजनासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने त्यांच्या कर्मचारी वसाहतीतील बांधकामे हटवून जागा पालिकेला देण्यास सहमती दर्शवली होती. त्या बदल्यात संबंधित कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी आणि पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी महापालिकेकडून मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेने रेल्वे प्रशासनाला २ कोटी २४ लाख ९१ हजार ७६४ रुपये एकरकमी दिले होते. आता पुढील टप्प्यात रस्ता रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणाची कामे हाती घेण्यात येणार असून त्यासाठी आणखी १.८२ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
या प्रकल्पामुळे वांद्रे पश्चिम स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून पादचाऱ्यांसाठीही अधिक सुरक्षित आणि सुटसुटीत व्यवस्था निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *