“अंतर्नाद” या भव्य संगीत नाटकाच्या शुभारंभ प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 “अंतर्नाद” या भव्य संगीत नाटकाच्या शुभारंभ प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, दि १८
आजच्या युगात प्रत्येक माणूस हरवलेला आहे. “स्व” मधला विठ्ठल शोधण्यासाठी “अंतर्नाद” पहावा. साक्षात विठ्ठल दर्शनाची अनुभूती मिळते. भक्तीरसाने ओथंबलेल्या यातील प्रत्येक कलाकार आपल्याला वारीला न जाताही वारी अनुभवायची संधी देतात. अंतर्नाद या संगीत नाटकातील एकही गीत कॉपी केलेले नाही केवळ या प्रयोगासाठी लिहिले आहेत हे नाविन्यपूर्ण आहे. शुभारंभाचा हा प्रयोग संस्मरणीय झाला आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केले.
‘अंतर्नाद’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी, (दि.१६) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला. यावेळी आयुक्त बोलत होते.
यावेळी तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात आळंदी ज्ञानेश्वर संस्थान कमिटी अध्यक्ष भावार्थ देखणे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व मोरया थिएटरचे संस्थापक, “अंतर्नाद” चे निर्माते भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.
ज्ञानेश्वर संस्थान कमिटी अध्यक्ष भावार्थ देखणे यांनी सांगितले की, अंतर्नाद पाहून नाट्यगृहातील प्रत्येक व्यक्ती भारावलेला आहे. भगवंताच्या प्रति आपण फक्त आणि फक्त नतमस्तक होतो. माझे वडील डॉ. रामचंद्र देखणे नेहमी सांगायचे की, ज्ञान, ध्यान आणि समाधान म्हणजे पंढरपूरची वारी होय. ज्ञानी माणसांना पंढरपूरची उपासना आहे. ध्यानी माणसांना ध्यानाची उपासना आहे. सामान्य माणसांना समाधानाची उपासना आहे. खऱ्या अर्थाने हा प्रयोग पाहिल्यानंतर अडीच तासात नंतर जे समाधान प्राप्त होते ते कशानेही प्राप्त होत नाही. एकदा का माझ्यातल्या मी पणाचा अंत झाला की मी या जगामध्ये किती लहान आहे. खऱ्या अर्थाने या पांडुरंगाला भेटण्यासाठी, परब्रम्हाला आनंद देण्यासाठी प्रत्येक कलाकाराने प्रत्यक्ष भगवंत होऊन आम्हालाही नाचायला लावले हे अंतर्नादचे वैशिष्ट्य आहे. या वारीत मला माझ्या वडिलांचे दर्शन झाले असेही भावार्थ देखणे म्हणाले.
भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, अंतर्नाद ची निर्मिती करून मला माझी आई परत सापडली असे वाटते. ५१ कलाकारांच्या या टीमने पहिलाच प्रयोग अगदी २५ वा असल्यासारखा अभिनय व काम केले आहे.
या भव्य संगीत नाटकाचा दुसरा प्रयोग हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात शुक्रवारी (दि. २२ मे), सायंकाळी सात वाजता होणार आहे. रसिक प्रेक्षकांसाठी या नाटकाची तिकिटे ‘बुक माय शो’ आणि ‘तिकीट खिडकी’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तसेच चिंचवड येथील नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवरही विक्री सुरू आहे. अंतर्नाद चे कलाकार प्रणव सपकाळे, मनोज डाळिंबकर, निरंजन पेडगावकर, अंकिता शिवतरे, राजू बंग आदींसह सर्वांनी उत्तम कामगिरी करत पहिलाच प्रयोग यशस्वी केला आहे अशी माहिती दिग्दर्शक मनोज डाळिंबकर यांनी दिली.
पोवाडा, पिंगळा, वासुदेव, लावणी, जात्यावरील गाणी, भूपाळी आणि रॅप साँगचा समावेश करण्यात आलेल्या या नाटकाचे लेखन विनोद रत्ना, संकल्पना व दिग्दर्शन मनोज डाळींबकर, संगीत निरंजन पेडगावकर आणि गीते मुराद तांबोळी यांनी शब्दबद्ध केली आहेत. नृत्यदिग्दर्शन अंकिता शिवतरे व सौगंध कापसे यांनी केले आहे. तांत्रिक बाजू अभिप्राय कामठे (प्रकाश योजना), कमलेश बिचे (रंगभूषा) आणि वेदिका काळे (वेशभूषा) यांनी सांभाळली आहे. सहाय्यक दिग्दर्शन आकाश थिटे यांनी केले आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *