पुढील ३ दिवस IMD कडून उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबई, दि. १२ : राज्यभरातील अनेक शहरांमध्ये उष्णतेचा पारा ४० पार पोहोचला असतानाच IMD ने पुढील ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात उन्हाचा तडाखा अधिकच तीव्र झाला असून, विशेषतः अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यांत तापमानाचा पारा 45.3 अंशांच्याही पुढे गेल्याने नागरिक होरपळून निघत आहेत. नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने संपूर्ण विदर्भासाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला असून, येत्या चार ते पाच दिवसांत तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या विदर्भात उष्णतेच्या लाटेसाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून, ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव कमी झाल्याने उत्तरेकडील राज्यांतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात मोठी वाढ होत आहे. आगामी काही दिवसांत विदर्भाच्या पाऱ्यात 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 45 ते 46 अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या वाढत्या उष्म्यामुळे विदर्भ पुन्हा एकदा होरपळून निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सद्यस्थितीत बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या वर असल्याने पुणे हवामान विभागाने नागरिकांना पुढील तीन दिवस आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील पाच दिवसांत पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने उकाडा कमी होण्याचे चिन्ह नाहीत. उलट विदर्भात येत्या चार ते पाच दिवसांत तापमानात मोठी वाढ होऊन काही भागांत ‘यलो अलर्ट’ कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
SL/ML/SL