नगरसेवकांना १ लाख मानधनाची मागणी !
प्रवास भत्ता १५–२० हजार करण्याची सूचना
मुंबई, दि २०: पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या दैनंदिन नागरी प्रश्नांवर काम करणाऱ्या नगरसेवकांचे मानधन वाढविण्याची मागणी पुढे आली आहे. समाजवादी पक्षाच्या नगरसेविका अमरीन अब्राहानी यांनी महापौर रितू तावडे यांना पत्र देत नगरसेवकांना मासिक किमान १ लाख रुपये मानधन तसेच १५ ते २० हजार रुपये प्रवास भत्ता देण्याची मागणी केली आहे.
अब्राहानी यांनी पत्रात नमूद केले आहे की, नगरसेवक आणि आमदार हे दोघेही जनतेकडून थेट निवडून येतात. मात्र अधिकार, मानधन, सुविधा आणि कायदेशीर संरक्षणाच्या बाबतीत मोठी तफावत दिसून येते. मुंबईतील सुमारे १.२ कोटी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांवर नगरसेवक सातत्याने कार्यरत असतानाही त्यांच्या मानधनात २०१७ पासून कोणतीही वाढ झालेली नाही.
बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असून २०२६-२७ साठी सुमारे ८० हजार ९५२ कोटींचे अंदाजपत्रक आहे. तरीही नगरसेवकांना कर्मचारी सहाय्य, प्रवास सुविधा, वैद्यकीय सुविधा आणि पदाला साजेशी प्रतिष्ठा यांचा अभाव असल्याने जनसेवा प्रभावीपणे करणे कठीण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
……….
प्रमुख मागण्या
मासिक मानधन किमान १ लाख रुपये करणे
वैयक्तिक सहाय्यक/सचिव नेमण्यासाठी २५ हजार रुपये प्रतिमाह भत्ता
प्रवास भत्ता १५ ते २० हजार रुपये प्रतिमाह
स्वतः व कुटुंबासाठी महानगरपालिका/शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वसमावेशक वैद्यकीय सुविधा
प्रभागात आवश्यक सोयींसह स्वतंत्र कार्यालयीन जागा
सभागृह व समित्यांतील वक्तव्यांसाठी मर्यादित कायदेशीर संरक्षण
किमान एक कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर निवृत्ती वेतन योजना
……………
आमदार-नगरसेवक तफावत
पत्रात आमदार आणि नगरसेवकांच्या सुविधांमधील फरकही मांडण्यात आला आहे. आमदारांना १.६० ते २.५० लाखांपर्यंत मानधन, मोफत रेल्वे/विमान प्रवास, वाहन, चालक व वैयक्तिक सहाय्यक अशा सुविधा मिळतात. त्याउलट नगरसेवकांना सध्या सुमारे २५ हजार मानधन, मर्यादित प्रवास भत्ता आणि इतर सुविधा अपुऱ्या प्रमाणात मिळतात.
७४व्या घटनादुरुस्तीच्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी नगरसेवकांचे मानधन आणि सुविधा वाढविणे आवश्यक असल्याचे अब्राहानी यांनी पत्रातून नमूद केले आहे.JS/ML/MS