‘प्लास्टिवर्ल्ड २०२६’ची बी-टू-बीमधील भक्कम कामगिरीच्या माध्यमातून झाली यशस्वी सांगता
मुंबई, दि २६: प्लास्टिकच्या तयार उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘प्लास्टिवर्ल्ड २०२६’ या २३ ते २५ मार्च २०२६ दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आयोजित बी-२-बी प्रदर्शनाची यशस्वी सांगता बुधवारी बांद्रा येथे यशस्वीरीत्या झाली. या प्रदर्शनात जागतिक खरेदीदार, भारतीय एमएसएमई आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज एकत्र आले आणि त्यामुळे निर्यातकेंद्रित व्यवसाय वृद्धीसाठी हे एक प्रभावी व्यासपीठ ठरले.
तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात शंभरहून अधिक भारतीय प्रदर्शकांनी विविध प्लास्टिक उत्पादने सादर केली. ४७ देशांतील २१० हून अधिक खरेदीदारांनी यात सहभाग घेतला. त्यांत १६०पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि ५० हून अधिक स्त्रोत एजंट व संस्थात्मक खरेदीदारांचा समावेश होता. रिलायन्स रिटेल आणि आयकिया सारख्या प्रमुख भारतीय रिटेल कंपन्यांनीही यात सहभाग नोंदवला.
या प्रदर्शनादरम्यान सुमारे ४००० पूर्वनियोजित बी-२-बी बैठका झाल्या तर २६ विशेष बैठकाही विविध कक्षांमध्ये आयोजित करण्यात आल्या. प्रत्येक बैठक १५ मिनिटे चालली आणि प्रदर्शकांच्या स्टॉलवरही विस्तृत चर्चेसाठी नेटवर्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या प्रदर्शनातून सुमारे ६० कोटी रुपयांचे व्यवहार निश्चित झाले आणि ८०० हून अधिक सामंजस्य करार करण्यात आले. प्रत्येक प्रदर्शकाला सरासरी २० ते २५ दर्जेदार व्यावसायिक संधी खुल्या झाल्या आणि यातून या व्यासपीठाचा प्रभाव लक्षात येतो.
या वर्षीच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे भारत–न्यूझीलंड बिझनेस कौन्सिल (आयएनझेडबीसी)ने ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स’ (एफआयइओ)तसेच ‘ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (एआयपीएमए) यांच्याबरोबर केले महत्त्वपूर्ण करार. या करारांमुळे द्विराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळणार असून आगामी मुक्त व्यापार करारांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निर्यातदारांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तसेच काही क्षेत्रांमध्ये शुल्क सवलती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या करार समारंभाला ‘आयएनझेडबीसी’ चे अध्यक्ष श्री. एडविन पॉल, ‘एफआयइओ’चे महासंचालक व सीईओ डॉ. अजय सहाय, चे अध्यक्ष श्री. सुनील शाह आणि ‘एआयपीएमए’ गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष श्री. अरविंद मेहता उपस्थित होते.
डॉ. अजय सहाय यांनी जागतिक आर्थिक आव्हानांनंतरही भारताने पहिल्या ११ महिन्यांत ७९१ अब्ज डॉलरची निर्यात साध्य केल्याचे सांगितले. त्यांनी नमूद केले की, “भारत–न्यूझीलंडसह आगामी मुक्त व्यापार करारांमुळे निर्यात संधी वाढतील आणि जागतिक स्पर्धात्मकता बळकट होईल.”
श्री. अरविंद मेहता यांनी ‘प्लास्टिवर्ल्ड’मुळे उद्योग संघटनांमध्ये सहकार्य वाढल्याचे सांगितले आणि पुढील तीन वर्षांत प्लास्टिक निर्यात चारपट वाढवून ५० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे ‘एआयपीएमए’ चे उद्दिष्ट पुन्हा अधोरेखित केले.
श्री. एडविन पॉल यांनी भारत–न्यूझीलंड भागीदारीला ‘द्विपक्षीय व्यापारातील नवे पर्व’ असे संबोधले. त्यांनी न्यूझीलंडच्या शाश्वतता आणि उच्च मूल्य उत्पादनातील सामर्थ्याचा उल्लेख करत भारतीय उद्योगाच्या पर्यावरणपूरक उत्पादनाकडे असलेल्या वाढत्या कलाचे कौतुक केले.
या प्रदर्शनातील बी-२-बी बैठका २१ देशांतील आयात प्रवाहांच्या विश्लेषणावर आधारित होत्या. सुप्रीम इंडस्ट्रीजचे श्री. एम. पी. तपारिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे श्री. कमल नानावटी यांच्या मार्गदर्शनामुळे खरेदीदार-विक्रेता संवाद अधिक परिणामकारक ठरला.
याशिवाय, ‘एफआयइओ’तर्फे निर्यात व्यवसायाशी संबंधित करार, गुणवत्ता प्रमाणपत्रे, पॅकेजिंग, इएसजी पद्धती आणि एमएसएमई योजनांवर मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली.
‘एआयपीएमए’ आणि ‘एफआयइओ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्लास्टिवर्ल्ड’ हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. सध्या जागतिक प्लास्टिकच्या तयार उत्पादनांचा व्यापार सुमारे १.३ ट्रिलियन डॉलर असून भारताचा त्यातील वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. पुढील तीन वर्षांत हा वाटा वाढवून ५० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. KK/ML/MS