रस्ते काँक्रिटीकरण कामे करताना सूक्ष्म नियोजन करावे, महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांचे निर्देश
मुंबई, दि १३
‘खड्डेमुक्त मुंबई’ या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे वाटचाल करत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण वेगाने सुरू आहे. काँक्रिट रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणि सुलभता वाढत असून नागरिकांचा मौल्यवान वेळ तसेच इंधनाची लक्षणीय बचत होत आहे. काँक्रिटीकरण टप्पा १ अंतर्गत निर्धारित उद्दिष्टांपैकी तब्बल ७७ टक्के कामे पूर्ण झाली आहेत, तर टप्पा २ अंतर्गत ५२ टक्के कामे पूर्णत्वास गेली असून एकूण मिळून ६३ टक्के कामे यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहेत. यापुढील कालावधीत काँक्रिटीकरण कामे करताना रस्तेनिहाय सूक्ष्म नियोजन करावे. हाती घेतलेला रस्ता, खोदण्यात आलेला रस्ता निश्चित केलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावा, असे स्पष्ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी दिले आहेत. काँक्रिटीकरण कामे करताना लोकप्रतिनिधींसमवेत संवाद साधावा, त्यांना इत्यंभूत माहिती द्यावी, त्यांचा प्रतिसाद मिळवावा, असे निर्देशही श्री. गगराणी यांनी दिले आहेत.
मुंबईच्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वाकांक्षी सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत शहर आणि उपनगर भागात काँक्रिटीकरण कामे सुरू आहेत. या कामांचा महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी काल (दिनांक ११ फेब्रुवारी २०२६) आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम, प्रमुख अभियंता (रस्ते) श्री. मंतय्या स्वामी यांच्यासह संबंधित अभियंते उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी म्हणाले की, रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पामुळे रस्ते प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि जलद होणार आहे. काँक्रिट रस्त्यावर पावसामुळे खड्डे होण्याचे प्रमाण अत्यल्प राहते, परिणामी देखभाल आणि परिरक्षणाचा खर्चही मोठ्या प्रमाणावर वाचतो. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला आधुनिक, सुरक्षित आणि सुयोग्य स्वरूप देण्याच्या दृष्टीने रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत दिनांक १० फेब्रुवारी २०२६ अखेर एकूण १५९४ रस्त्यांचे मिळून ४३०.६९ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. टप्पा १ अंतर्गत निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ७७ टक्के तर, टप्पा २ अंतर्गत निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ५२ टक्के लक्ष्यपूर्ती करण्यात आली आहे. म्हणजेच टप्पा १ आणि टप्पा २ असे एकत्रित मिळून पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी ६३ इतकी आहे.
काँक्रिटीकरण कामे करताना रस्तेनिहाय सूक्ष्म नियोजन केल्यामुळे नागरिकांना कमीत कमी असुविधा होईल, अशा पद्धतीने अंमलबजावणी सुरु आहे. मात्र, हे साध्य करण्यासाठी हाती घेतलेला रस्ता, खोदण्यात आलेला रस्ता, निश्चित केलेल्या कालमर्यादेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. मागील सत्रातील संगमस्थान ते संगमस्थान पूर्ण झालेल्या रस्त्यांची जी कामे दिनांक १ ऑक्टोबर २०२५ नंतर या सत्रात चालू करण्यात आली आहेत, ती कामे प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. या सत्रात नव्याने चालू केलेले रस्तेकामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असेदेखील श्री. गगराणी यांनी नमूद केले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर म्हणाले की, मुंबईतील प्रचंड लोकसंख्या घनता आणि दाट नागरी बांधकाम संरचनेमुळे, इतक्या मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणारा हा प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक आहे. तथापि, नियोजनबद्ध पद्धती व प्रभावीपणे काँक्रिटीकरण कार्यक्रम अंमलात आणला जात आहे. कॉंक्रिट रस्त्यांची अंमलबजावणी सुरु असताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. कामे सुरु करताना कामाच्या गुणवत्तेत विशेष लक्ष द्यावे, गुणवत्तापूर्ण काम करणे म्हणजे केवळ रस्त्याचा पृष्ठभाग चांगला असणे नव्हे तर, त्याच्या बेस लेवलपासून प्रत्येक स्तरावर मानकाप्रमाणे सर्व घटकस्तर (Aggregates) व त्याच्याशी संबंधित आर्द्रता (Moisture), तापमान (Temperature) इत्यादीसह तांत्रिक निकष तंतोतंत पाळले जाणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीने कामे होण्यासाठी प्रचंड आग्रही असावे.
भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे काँक्रिटीकरण कामे अधिक गुणवत्तापूर्ण होत आहेत, असा प्रतिसाद सहायक अभियंत्यांनी दिला आहे. विद्यमान सत्र संपण्यापूर्वी ७५ दिवसांचा कालावधी हातामध्ये आहे. या ७५ दिवसांचे सूक्ष्म नियोजन केले तर पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरण प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्प्पा गाठता येऊ शकतो, असेदेखील श्री. बांगर यांनी नमूद केले.KK/ML/MS