*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाठबळामुळे तृतीयपंथीयांच्या पंखांना बळ; काळा घोडा महोत्सवात ‘उमंग’ बचत गट
मुंबई प्रतिनिधी
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या घटकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध योजना सातत्याने अंमलात आणत असते. याच अनुषंगाने मुंबईतील प्रसिद्ध ‘काळा घोडा’ कला महोत्सवात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागातर्फे स्थापित करण्यात आलेल्या ‘उमंग’ या तृतीयपंथी बचत गटाच्या दालनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘उमंग’ बचत गटाने हस्तकलेच्या वस्तू तयार केल्या आहेत. काळा घोडा उत्सवात अवघ्या तीन दिवसांत या बचत गटाने ९० हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री केली आहे.
गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाकडून सातत्याने विविध योजना राबविण्यात येत असतात. या अंतर्गत महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. बचत गटांनी तयार केलेल्या उत्पदनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, प्रसिद्धी मिळावी तसेच त्यातून बचत गट सदस्यांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी महानगरपालिका विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते.
याच धोरण अंतर्गत तृतीयपंथीयांना सामाजिक प्रतिष्ठा आणि हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये के पश्चिम विभागात ‘योगी राणी’ आणि त्यांच्या ९ सहकाऱ्यांनी मिळून ‘उमंग बचत गट’ ची स्थापना केली. महानगरपालिकेतर्फे या गटाला सुरुवातीला १० हजार रुपयांचे अनुदान आणि आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले. योगी राणी यांच्याकडे असलेली आभूषणे बनविण्याची कला त्यांनी सहकाऱ्यांनाही शिकवली.
उमंग बचत गटाचा प्रवास आता ‘काळा घोडा’ सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या महोत्सवापर्यंत पोहोचला आहे. कलाकारांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मुंबईतील काळा घोडा महोत्सव ओळखला जातो. या महोत्सवाच्या माध्यमातून नवकलाकारांना सतत उर्जा मिळत असते. यंदाच्या उत्सवात नियोजन विभागाच्या संचालक डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांच्या पुढाकाराने या उमंग बचत गटाला काळा घोडा उत्सवात प्रदर्शनासाठी दालन उपलब्ध करून देण्यात आला. ज्यूट बॅग्स, आकर्षक आभूषणे आणि विविध शोभेच्या वस्तूंनी सजलेल्या या दालनाला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण महोत्सवात ‘सर्वात कमी दर आणि सर्वोत्तम डिझाइन्स’ असलेले दालन म्हणून उमंग बचत गटाचे कौतुक झाले.
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना उमंग गटाच्या योगी राणी म्हणाल्या, “आम्हाला आमची कला आणि कौशल्य दाखविण्यासाठी या उत्सवात मोठी संधी मिळाली. तीन दिवसांत ९० हजार रुपयांची विक्री होणे, ही आमच्या उदरनिर्वाहासाठी मोठी बाब आहे. आम्हाला अशी संधी मिळाल्यास आम्ही सन्मानाने जगू शकतो.”
वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महानगरपालिका नेहमीच प्रयत्नशील असते. ‘उमंग’ गटाचे हे यश इतर तृतीयपंथीयांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.